हरियाणा शासनाकडून गोहत्या आणि गोतस्करी रोखण्यासाठी विशेष गोरक्षण कृती दलाची स्थापना

विशेष गोरक्षण कृती दलाची स्थापना करणे हा चांगला निर्णय आहे; मात्र दलाकडून प्रामाणिकपणे कार्यही झाले पाहिजे, याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे, असेच हिंदूंना वाटते !

चंडीगड – गोतस्करी, गोहत्या आणि बेवारस पशूंचा वावर रोखण्यासाठी हरियाणा शासनाकडून प्रत्येक जिल्हास्तरावर ‘स्पेशल काऊ प्रोटेक्शन टास्क फोर्स’ची (विशेष गोरक्षण कृती दलाची) स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये प्रशासकीय अधिकारी, पोलीस यांच्यासमवेत गोरक्षक आणि गोसेवक यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. याविषयीची अधिसूचना काढण्यात आली आहे. या दलामध्ये राज्यस्तरावर ६ आणि जिल्हास्तरावर ११ सदस्य असणार आहेत.

काँग्रेसने गोरक्षक आणि गोसेवक यांना या दलामध्ये सहभागी करून घेण्यावरून टीका केली आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या रंजीता मेहता यांनी म्हटले की, गोरक्षक गोतस्करी करणार्‍यांकडून खंडणी गोळा करतात, हे सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे सरकारच्या दलामध्ये पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांनाच सहभागी करून घेण्यात यावे. गोरक्षकांना यात स्थान देऊ नये. केवळ ज्यांचे चरित्र चांगले आहे, अशाच गोरक्षकांना यात सामावून घ्यावे.