धर्मसंस्थापनेसाठी सर्वस्वाचा त्याग करा !

गुरुपौर्णिमेनिमित्त परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा संदेश

परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

‘गुरुपौर्णिमा हा गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. प्रत्येक सश्रद्ध हिंदु या दिवशी आध्यात्मिक गुरूंप्रती कृतज्ञता म्हणून स्वक्षमतेनुसार तन-मन-धन समर्पित करत असतो. अध्यात्मात तन, मन आणि धन यांचा त्याग करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे; पण गुरुतत्त्वाला शिष्याचा एक दिवसाचा तन-मन-धनाचा त्याग नको, तर सर्वस्वाचा त्याग हवा असतो. सर्वस्वाचा त्याग केल्याविना मोक्षप्राप्ती होत नाही; म्हणून आध्यात्मिक उन्नती करण्याची इच्छा असणार्‍यांनी सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे.

व्यक्तीगत जीवनात धर्मपरायण जीवन जगणारे सश्रद्ध हिंदू असोत कि समाजसेवी, देशभक्त आणि हिंदुत्वनिष्ठ असे समष्टी जीवनातील कर्मशील हिंदू असोत, त्यांना साधनेसाठी सर्वस्वाचा त्याग कठीण वाटू शकतो; परंतु त्यांना राष्ट्र-धर्म कार्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणे तुलनेत सुलभ वाटू शकते. सध्याच्या काळात धर्मसंस्थापनेसाठी कार्य करणे, ही सर्वोत्तम समष्टी साधना आहे. धर्मसंस्थापना म्हणजे समाजव्यवस्था आणि राष्ट्ररचना आदर्श करण्याचा प्रयत्न करणे होय. हे कार्य कलियुगात करण्यासाठी समाजाला धर्माचरण शिकवणे आणि आदर्श राज्यव्यवस्थेसाठी वैधानिक संघर्ष करणे अपरिहार्य आहे. आर्य चाणक्य, छत्रपती शिवाजी महाराज यांनीही धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला होता. त्यांच्या त्यागामुळे धर्मसंस्थापनेचे कार्य यशस्वी झाले होते, हा इतिहास लक्षात ठेवा.

म्हणूनच धर्मनिष्ठ हिंदूंनो, या गुरुपौर्णिमेपासून धर्मसंस्थापनेसाठी म्हणजेच धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची सिद्धता करा आणि असा त्याग केल्याने गुरुतत्त्वाला अपेक्षित आध्यात्मिक उन्नती होईल, याचीही निश्चिती बाळगा !’

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले, संस्थापक, सनातन संस्था.