म्यानमारमधून भारतात मानव आणि सोने यांची तस्करी करणार्‍या टोळीतील ४ रोहिंग्यांना अटक

  • आतापर्यंत २ सहस्र लोकांना बनावट कागदपत्रांद्वारे आणले भारतात !

  • रोहिंग्या महिलांची भारत आणि मलेशिया येथे विक्री !

देशातील घुसखोर रोहिंग्या गुन्हेगारी कारवायाही करू लागले आहेत. याचीच आतापर्यंत भीती होती. आतातरी सरकार त्यांना तात्काळ देशातून हाकलून लावण्यासाठी कृतीशील होईल का ?

आतंकवादविरोधी पथकाने मानव आणि सोने तस्करी प्रकरणी अटक केलेले रोहिंग्या मुसलमान

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने मानव आणि सोने तस्करी करणार्‍या एका टोळीतील ४ रोहिंग्या मुसलमानांना अटक केली आहे. यातील दोघांना बुलंदशहरमधून, तर अन्य दोघांना मेरठमधून अटक करण्यात आली आहे. त्यांची टोळी आंतरराष्ट्रीय स्तरावर कारवाया करत असून त्यांच्या पैशांचे व्यवहार हवालामार्गे होत असल्याची माहिती या चौघांनी चौकशीमध्ये दिली. हाफिज सफीक, मुफजुर्रहमान, अजीजुर्रहमान आणि महंमद इस्लाइल अशी या चौघांची नावे आहेत. हे चौघेही मूळचे म्यानमार येथील रहाणारे आहेत.

१. या टोळीकडून म्यानमारमधील रोहिंग्या युवकांचे बनावट आधार आणि मतदान कार्ड बनवून पारपत्र मिळवले जात होते. नंतर भारतीय ओळखपत्र दाखवून म्यानमारमधून त्यांना भारतात कारखान्यांमध्ये काम देण्याचे आश्‍वासन देऊन आणले जात होते. यातून या टोळीला दलाली मिळत होती. अटक करण्यात आल्यावर त्यांच्याकडून कागदपत्रे आणि विदेशी पैसे जप्त करण्यात आले.

२. या टोळीमध्ये अनेक जणांचा सहभाग आहे. यात काही भारतीयही सहभागी असल्याची माहिती या चौघांनी चौकशीमध्ये दिली. त्यांची माहिती पोलिसांना मिळाली असून लवकरच त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.

३. या टोळीचा संपर्क मलेशियापर्यंत आहे. ही टोळी रोहिंग्या महिलांना भारत आणि मलेशिया या देशांत विकत आहेत. या टोळीने आतापर्यंत २ सहस्र लोकांना बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने भारतात आणले आहे. या सर्वांचा आता शोध घेण्यात येत आहे.