मालदा (बंगाल) येथील बांगलादेश सीमेवरून चिनी गुप्तहेराला अटक  

अशा गुप्तहेरांविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

चिनी गुप्तहेर हान जुनवेई (मध्यभागी )यासह सीमा सुरक्षा दलाचे जवान

मालदा (बंगाल) – सीमा सुरक्षा दलाने येथील बांगलादेश सीमेवरून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असलेल्या हान जुनवेई या ३६ वर्षीय चिनी नागरिकाला अटक केली आहे. हान जुनवेई चिनी गुप्तहेर असल्याचे चौकशीतून उघड झाले आहे. त्याच्याकडून चिनी पारपत्र, लॅपटॉप, २ आयफोन, १ बांगलादेशी सिम कार्ड, १ भारतीय सिम कार्ड, २ चिनी सिम कार्ड, २ पेन ड्राईव्ह, ३ बॅटरी, २ लहान टॉर्च, २ एटीएम् कार्ड, अमेरिकी डॉलर आदी वस्तू जप्त करण्यात आल्या.

१. चौकशीत जुनवेई याने सांगितले, ‘वर्ष २०१० मध्ये तो भारतात प्रथम भाग्यनगर येथे आला होता. वर्ष २०१९ नंतर ३ वेळा देहली आणि गुरुग्राम येथे आला होता.’

२. जुनवेई याच्या एका साथीदाराला उत्तरप्रदेश पोलिसांच्या आतंकवादविरोधी पथकाने अटक केली आहे. तो प्रतिमास १० ते १५ भारतीय सिम कार्ड चीनमध्ये पाठवत होता. जुनवेई याने सांगितले की, गुरुग्राममध्ये त्याचे एक हॉटेल आहे, ज्यात इतर अनेक चिनी नागरिक कार्यरत आहेत. (चिनी गुप्तहेरांचे भारतात एक हॉटेल होईपर्यंत भारतीय गुप्तचर यंत्रणा झोपा काढत होत्या का ? – संपादक)