पाकचे वस्त्रहरण !

जेव्हा आपण इतरांवर आरोप करतो, तेव्हा ४ बोटे आपल्याकडे असतात’, हा साधा नियम पाकिस्तानला कळला नाही आणि त्यामुळे त्याची आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर चांगलीच नाचक्की झाली. इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्यातील सशस्त्र संघर्षानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने मानवाधिकार परिषदेचे आयोजन केले होते. यामध्ये पाकचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी ‘जेरूसेलममधील मानवाधिकाराची गंभीर स्थिती’ या विषयावर व्याख्यान दिले. त्यात ते म्हणाले की, पाकिस्तान जेरुसलेममधील प्रांतीय शांतता आणि स्थैर्य यांच्यासह तेथील नागरिकांच्या मानवाधिकारांचे समर्थन करत राहील. पॅलेस्टिनी नागरिकांना त्यांच्या मानवाधिकारांपासून वंचित ठेवले जात आहे. इस्रायलने तब्बल ११ दिवस पॅलेस्टाईनवर आक्रमण केले. पीडित आणि आक्रमक देशांची एकमेकांशी तुलना केली जाऊ शकत नाही. पॅलेस्टिनी नागरिकांना सन्मानाने जगणे आणि त्यांचे भवितव्य ठरवणे, यांचा पूर्ण अधिकार आहे.’ जो पाकिस्तान गेल्या ७ दशकांपासून काश्मीरची भूमी रक्तरंजित करत आहे; त्याच्या तोंडी ‘शांतता’, ‘पीडित’, ‘सन्मानाने जगणे’, असे शब्द शोभतात का ? पाकच्या या आगाऊपणाला प्रत्युत्तर दिले नाही, तर तो इस्रायल कसला ? इस्रायलने तत्परतेने अमेरिकेचा पाकमधील मानवाधिकाराच्या उल्लंघनाचा अहवाल पाकसमोर धरून त्याला आरसा दाखवला. या अहवालात पाकच्या सैन्याकडून तेथील नागरिकांवर केल्या जाणार्‍या अत्याचारांचे भले मोठे उतारे आहेत. वर्ष २०१८ मध्ये इम्रान खान पंतप्रधान झाल्यापासूनही पाकच्या या स्थितीत कोणताही पालट झालेला नाही, अशी पुस्तीही त्यात जोडण्यात आली आहे. या अहवालामुळे पाकची जगभर नाचक्की झाली. इतकेच नव्हे, तर इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाचे महासंचालक अलोन उशपिजो यांनी ‘मानवाधिकाराचा ‘विजेता’ पाकिस्तान हा प्रत्यक्षात काचेच्या महालात रहातो; परंतु सध्या तो मध्य-पूर्वेतील एकमेव लोकशाही देश असलेल्या इस्रायलला शिकवत आहे. हाच सर्वांत मोठा कपटीपणा आहे’, अशा शब्दांत पाकिस्तानवर शाब्दिक आक्रमण केले. यामुळे आधीच नाचक्की झालेल्या पाकचे वस्त्रहरणच झाले. वास्तविक पॅलेस्टाईनचे आंधळे समर्थन करतांना पाकने जो पक्षपात केला आहे, तो दुर्लक्षून चालणार नाही किंबहुना तोच इस्रायलने दाखवून दिला. इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षाचा प्रारंभ पॅलेस्टाईनने केला आहे, हे पाक जाणीवपूर्वक सांगत नाही. नमाजासाठी मोठ्या संख्येने एकत्र न जमण्याचा आदेश इस्रायली पोलिसांनी दिल्यानंतर पॅलेस्टाईनच्या ‘हमास’ या जिहादी आतंकवादी संघटनेने इस्रायलवर एक-दोन नव्हे, तर तब्बल दीड सहस्र रॉकेट्स डागले ! ही सिद्धता एका रात्रीत होत नसते. त्यासाठी पुष्कळ अगोदरपासून योजना आखावी लागते आणि योग्य संधीची वाट पहावी लागते. ते ‘हमास’ने साध्य करण्याचा प्रयत्न केला. हे सत्यही पाक सांगत नसला, तरी ते जगासमोर आलेच आहे. बाणेदार इस्रायलने पॅलेस्टाईनला आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले, त्यात नेहमीप्रमाणे पॅलेस्टाईनसह सर्व इस्लामी राष्ट्रांची भंबेरी उडाली. त्यातूनच कागदी घोडे नाचवणार्‍या अशा परिषदा भरवल्या जात असून पाकसारखी संधीसाधू राष्ट्रे वहात्या गंगेत हात धुऊन घेत आहेत.

पाकचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी

पॅलेस्टाईन समर्थनाआडून पाकचा भारतद्वेष !

मुळात पाकिस्तान हा जसा कुरापतखोर देश आहे, तितकाच तो आगाऊही आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्यातील सशस्त्र संघर्षानंतर जगभरातील इस्लामी राष्ट्रांना संघटित करण्याचा आटापिटा तुर्कस्तान आणि पाकिस्तान हे देश करत आहेत. त्यासाठी पाकचे परराष्ट्रमंत्री कुरेशी हे तुर्कीत तळ ठोकून आहेत. स्वतः अत्याचारी असलेल्या पाकला पॅलेस्टाईनचा इतका पुळका येण्याचे कारण काय ? त्याचे उत्तर एकच ते म्हणजे भारतद्वेष ! पाकला येनकेन प्रकारेण काश्मीरचे सूत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ‘भारत काश्मीरमधील नागरिकांच्या मानवाधिकारांचे हनन करत आहे’, असे भासवून जगभरातील राष्ट्रांना भारताविरुद्ध चेतवायचे आहे. त्यासाठी भारताविरुद्ध तो सैन्यबळापासून आतंकवादापर्यंतच्या सर्व माध्यमांचा करता येईल तितका पुरेपूर वापर करत आहे. एका बाजूला सशस्त्र कृती करायची दुसर्‍या बाजूला शांततेची कबुतरे उडवायची, अशी पाकची दुटप्पी भूमिका आहे. तीच इस्रायलने समोर आणली. पाक काश्मीर सूत्रावरून भारताविरुद्ध ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज्’ अर्थात् ‘ओआयसी’ देशांना एकत्र आणण्याचा आटापिटा गेल्या २ वर्षांपासून करत आहे. त्यात त्याच्या वाट्याला कमालीचे अपयश किंबहुना मानहानीच अधिक आली आहे. सौदी अरबसारख्या कट्टर इस्लामी राष्ट्रांनी उघडपणे भारताची बाजू घेऊन पाकला घरचा रस्ता दाखवला आहे. अन्य अनेक इस्लामी देशांनीही भारताचे उघड समर्थन करत पाकला त्याच्या कुरापती दाखवून दिल्या आहेत. भारताने काहीही न बोलताही ‘ओआयसी’त उभी फूट पडली आहे. हा भारताच्या परराष्ट्र नीतीचा विजय म्हणावा लागेल. येथे नाक आपटल्यानंतर पाकला काश्मीर सूत्राचे तुणतुणे वाजवायला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ हवे होते, ते इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षाच्या रूपाने आयते मिळाले. म्हणजे कलाकार तेच, भूमिका तीच, पटकथाही तीच, केवळ व्यासपीठ वेगळे. तथापि पाकचे हे ‘नाटक’ बघायला आता इस्लामी राष्ट्रेही सिद्ध नाहीत ! पाकने पॅलेस्टाईनचे आवेशपूर्ण समर्थन करण्यामागची ही खरी पटकथा आहे.

भारतानेही आवाज उठवावा !

इस्रायलने पाकविषयी उघड केलेला अहवाल भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. एकप्रकारे इस्रायलने पाकमध्ये अल्पसंख्य हिंदूंचा होत असलेला छळ, तसेच त्यांच्या मानवाधिकारांचे होणारे उल्लंघन यांना वाचा फोडली आहे. याद्वारे त्याने पाकमधील पीडित हिंदूंची बाजू घेतली आहे. त्यामुळे भारतानेही आता या अहवालाला पाठिंबा दर्शवत पाकला एकाकी पाडले पाहिजे. खरे तर काश्मीरमध्ये प्रतिदिन रक्ताने होळी खेळणार्‍या पाकची पॅलेस्टिनी नागरिकांच्या शांततेसाठी ओरड म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज को’, या पठडीतली आहे. पाकच्या या वृत्तीला अन्य देश वाचा फोडत असतांना भारतानेही त्यांच्या सुरात सूर मिसळणे केव्हाही राष्ट्रहिताचेच ठरेल !