१२ वर्षांतून एकदा येणार्‍या कन्यागत महापर्वाच्या वेळी गंगेचे पाणी कृष्णा नदीत प्रवेश करत असल्याने त्या काळात कृष्णा नदीच्या पाण्याचा वायूमंडलावर होणारा परिणाम

धर्मपरंपरांविषयी नाविन्यपूर्ण अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

१४ एप्रिल २०२१ या दिवशी हरिद्वार येथे चालू असलेल्या कुंभपर्वातील तृतीय पवित्र स्नान आहे. यानिमित्ताने…

हिंदूंनो, तीर्थक्षेत्रे आणि कुंभपर्वासारख्या हिंदु धर्मपरंपरा यांचे रक्षण करणे, हे धर्मकर्तव्यच आहे !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी (पिप)’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेली वैज्ञानिक चाचणी

​‘महाराष्ट्रातील महाबळेश्‍वर येथे कृष्णा नदीचे उगम स्थान आहे. गंगा नदी हिमालयात उगम पावते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. भौगोलिकदृष्ट्या या दोन्ही नद्यांमध्ये शेकडो किलोमीटरचे अंतर आहे; पण ‘ज्या वेळी गुरु ग्रह कन्या राशीत प्रवेश करतो, त्या मुहूर्तावर गंगेचे पाणी कृष्णा नदीत प्रवेश करते’, हे सर्वमान्य आहे. त्या शुभमुहूर्तावर कृष्णा नदीच्या काठी कन्यागत महापर्वकाल आरंभ होतो. हे ११.८.२०१६ या दिवशी बरोबर रात्री ९ वाजून २९ मिनिटांनी घडले. प्रती १२ वर्षांनी एकदा हा चमत्कार घडतो.

महाबळेश्‍वर येथील कृष्णा नदीचे उगम स्थान

या गोष्टीचा वैज्ञानिकदृष्ट्या तुलनात्मक अभ्यास करण्याच्या उद्देशाने ११.८.२०१६ या दिवशी तीन विविध वेळी कृष्णा नदीच्या पाण्याचे घेतलेले नमुने आणि उत्तरप्रदेशातील वाराणसी (काशी) येथील गंगेच्या पाण्याचा नमुना यांची ‘पिप’ (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि त्यांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

वाचकांना सूचना

जागेअभावी या लेखातील ‘पिप’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घटकांची सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदने रंगांच्या माध्यमातून दिसण्याची सुविधा असणे’, ‘चाचणीसंबंधाने घेतलेली दक्षता’, ‘प्रभावळीत दिसणार्‍या रंगांची माहिती’ इत्यादी नेहमीची सूत्रे https://www.sanatan.org/mr/PIP या सनातन संस्थेच्या संकेतस्थळावरील लिंकवर दिली आहेत.

१. वैज्ञानिक चाचणीतील घटकांविषयी माहिती

​‘गुरु ग्रहाने कन्या राशीत प्रवेश केला की, गंगेचे पाणी कृष्णा नदीत प्रवेश करते’, हे सर्वमान्य आहे. हा योग दर १२ वर्षांनी येतो. या वर्षी हा योग ११.८.२०१६ या दिवशी रात्री ९.२९ वाजता होता. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याचे पुढील सर्व नमुने ११.८.२०१६ या दिवशी ३ वेगवेगळ्या वेळी जेथे गंगा कृष्णेत प्रवेश करते त्या ठिकाणाहून घेतलेले आहेत.

१ अ. गंगेने कृष्णेत प्रवेश करण्यापूर्वी १२ घंटे आधीचे पाणी : हे पाणी महाराष्ट्रातील महाबळेश्‍वर येथे कृष्णा नदीच्या उगमस्थानचे आहे. ते सकाळी ९.३० वाजता, म्हणजे गंगेचे पाणी कृष्णा नदीत प्रवेश करण्यापूर्वी १२ घंटे आधीचे आहे.

१ आ. गंगेने कृष्णेत प्रवेश केल्यानंतर ६ मिनिटांनी घेतलेले पाणी : कृष्णा नदीच्या पाण्याचा हा नमुना रात्री ९.३५ वाजता, म्हणजे गंगेच्या पाण्याने कृष्णेत प्रवेश केल्यानंतर ६ मिनिटांनी घेतलेला आहे.

१ इ. गंगेने कृष्णेत प्रवेश केल्यानंतर १ घंटा ४६ मिनिटांनी घेतलेले पाणी : कृष्णा नदीच्या पाण्याचा हा नमुना रात्री ११.१५ वाजता, म्हणजे गंगेच्या पाण्याने कृष्णेत प्रवेश केल्यानंतर १ घंटा ४५ मिनिटांनी घेतलेला आहे.

१ ई. वाराणसी येथील गंगेचे पाणी : गंगा हिमालयात उगम पावते आणि उत्तर भारतातील विविध राज्यांमधून वहात बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. तिच्या उत्तरप्रदेशातील मार्गात वाराणसी (काशी) हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे गंगेचे पाणी तेथून आणलेले आहे.

२. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि निष्कर्ष

​या चाचणीत गंगेचे पाणी कृष्णा नदीत प्रवेश करण्यापूर्वीचे कृष्णा नदीचे पाणी, गंगेच्या पाण्याने कृष्णा नदीत प्रवेश केल्यानंतर ६ मिनिटांनी आणि १ घंटा ४६ मिनिटांनी घेतलेले कृष्णा नदीचे पाणी, तसेच वाराणसी (काशी) येथील गंगेचे पाणी यांची ‘पिप’ छायाचित्रे निवडली आहेत. ‘या चारही पाण्याच्या नमुन्यांमधून प्रक्षेपित होत असलेल्या स्पंदनांचा वातावरणावर काय परिणाम होतो ?’, हे या चाचणीतील ‘पिप’ छायाचित्रांच्या तुलनात्मक अभ्यासातून समजले.

२ अ. ‘पिप’ छायाचित्रांच्या प्रभावळीतील नकारात्मक आणि सकारात्मक स्पंदने दर्शवणारे रंग आणि त्यांचे प्रमाण

टीप १ – घटकाच्या अंतर्बाह्य स्तरांवरील नकारात्मक स्पंदने नष्ट करण्याची आणि सकारात्मक स्पंदनांची वृद्धी करण्याची क्षमता
टीप २ – घटकाच्या केवळ बाह्य स्तरावरील नकारात्मक स्पंदने नष्ट करण्याची आणि सकारात्मक स्पंदनांची वृद्धी करण्याची क्षमता

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.

श्री. रूपेश रेडकर

२ अ १. सनातन आश्रमातील सात्त्विक वातावरणामुळे मूलभूत नोंदीच्या वेळी सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण अधिक दिसणे : कलियुगातील सर्वसाधारण वास्तूमधून सकारात्मक स्पंदनांपेक्षा नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्याचे प्रमाण अधिक असते. ही चाचणी अत्यंत सात्त्विक अशा सनातन आश्रमात केलेली असल्याने मूलभूत नोंदीच्या वेळीही (चाचणीसाठी पाणी ठेवण्यापूर्वीही) प्रभावळीत सकारात्मक स्पंदनांचे एकूण प्रमाण नकारात्मक स्पंदनांपेक्षा अधिक आहे.

२ अ २. गंगेने कृष्णेत प्रवेश करण्यापूर्वी १२ घंटे आधीच्या पाण्यामुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण तेवढेच रहाणे :
गंगेने कृष्णेत प्रवेश करण्यापूर्वी १२ घंटे आधीच्या पाण्यामुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण तेवढेच राहिले आहे. याचे कारण कृष्णा नदीचे पाणी मुळातच सात्त्विक आहे.

२ अ ३. गंगेने कृष्णेत प्रवेश केल्यानंतर ६ मिनिटांनी, तसेच १ घंटा ४६ मिनिटांनी घेतलेल्या पाण्यामुळेे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण थोडे वाढणे :
गंगेने कृष्णेत प्रवेश केल्यानंतर ६ मिनिटांनी घेतलेल्या पाण्यात वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण थोडे वाढले आहे. याचे कारण सात्त्विक गंगेच्या पाण्यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याची सात्त्विकता आणखी वाढली. ही सात्त्विकता दीर्घ काळ टिकून राहिल्यामुळे गंगेने कृष्णेत प्रवेश केल्यानंतर १ घंटा ४६ मिनिटांनी घेतलेल्या पाण्यातही सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण मूलभूत नोंदीच्या प्रमाणापेक्षा अधिक आहे.

२ अ ४. वाराणसी येथील गंगेच्या पाण्यामुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ वाढणे : वाराणसी येथील गंगेच्या पाण्यामुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. गंगेचे पाणी अत्यंत सात्त्विक आहे. सात्त्विक वस्तूंतून सर्वाधिक प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात, हे यातून स्पष्ट होते. गंगेच्या याच गुणधर्मामुळे तिच्या जलात स्नान करणार्‍यांना आध्यात्मिकदृष्ट्या लाभ होतो.

हिंदु संस्कृतीमध्ये सर्वच नद्या पूजनीय आहेत. त्यातही गंगा विशेष महत्त्वाची आहे. गुरु ग्रह कन्या राशीत प्रवेश केल्यानंतर कृष्णा नदीच्या पाण्याची सात्त्विकता वाढते. या सात्त्विकतेचा लाभ भाविकांना मिळावा, यासाठी या काळात कन्यागत महापर्वाचे आयोजन करण्याची प्राचीन परंपरा किती योग्य आहे, हे लक्षात येते. आपल्या ऋषिमुनींनी कोणत्याही स्थूल उपकरणांद्वारे नव्हे, तर साधनेने प्राप्त झालेल्या ज्ञानामुळे कृष्णेच्या पाण्यात होणारा सूक्ष्म पालट जाणला, हे विशेष !’

– श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय (१७.९.२०१६)
ई-मेल : [email protected]

श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

वैज्ञानिकांना आवाहन !

​‘गुरु ग्रहाने कन्या राशीत प्रवेश केला की, गंगेचे पाणी कृष्णा नदीत प्रवेश करते’, या बुद्धीअगम्य घटनेचे वैज्ञानिकांनी संशोधन करावे. हे पाणी सहस्रो किलोमीटरचे अंतर पार करून एका क्षणात येथे कसे येते, याचाही विचार करावा.

१. वैज्ञानिक युगात सर्वत्र पाश्‍चात्त्यांची सदोष कालमापन पद्धत वापरली जाणे आणि पूर्णपणे निर्दोष अशी हिंदूंच्या पंचांगावर आधारित पद्धत न वापरली जाणे, हे दुर्दैवी !

​या वर्षी ११.८.२०१६ ला आलेला कन्यागत महापर्वाचा योग पुन्हा १२ वर्षांनी म्हणजे ११.८.२०२८ ला येईल का ? हे पाश्‍चात्त्य कालमापन पद्धतीच्या आधारे ठामपणे सांगता येणार नाही; कारण ती पद्धत सदोष आहे. याउलट हिंदूंची कालमापनाची पद्धत निर्दोष आणि सर्वाधिक वैज्ञानिक आहे. त्यामुळे पंचांगाच्या आधारे पुढील कन्यागत महापर्वाचा योग केव्हा येईल, ते ठामपणे सांगता येते. हिंदु राष्ट्रात कालमापनासाठी सर्वत्र हिंदु पंचांगच वापरले जाईल !

२. प्रत्येक बुद्धीअगम्य गोष्टीला ‘अंधश्रद्धा’ म्हणून सोडून देणे सोपे असणे; परंतु ती गोष्ट सिद्ध करण्यासाठी अपार कष्ट घ्यावे लागत असणे आणि ते कष्ट महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाकडून घेतले जाणे​

‘गुरु ग्रहाने कन्या राशीत प्रवेश केला की, गंगेचे पाणी कृष्णा नदीत प्रवेश करते’, ही बुद्धीअगम्य घटना दर १२ वर्षांनी घडते. भारतात अनेक ठिकाणी अशा अनेक बुद्धीअगम्य घटना घडत असतात. याला ‘अंधश्रद्धा’ म्हणून सोडून देणे सोपे आहे; कारण तसे केले की, काही करावेच लागत नाही; परंतु हे सर्व सिद्ध करायचे झाल्यास मात्र अपार कष्ट घ्यावे लागतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’चे साधक हे कष्ट घेत आहेत आणि देवाच्या कृपेला पात्रही होत आहेत.’

– (श्रीचित्‌शक्‍ति) सौ. अंजली गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (२१.८.२०१६, सकाळी १०.०१)

कोणतेही स्थूल उपकरण न वापरता अध्यात्मशास्त्राविषयी ज्ञान देणारे संतच विज्ञानापेक्षा श्रेष्ठ !

‘देवनदी गोदावरी, कुंभपर्व, कुंभपर्वाच्या काळातील पर्वस्नान, त्यामुळे होणारे पापक्षालन आदींविषयी प्राचीन ऋषीमुनी आणि सांप्रत काळातील संत यांनी लिहून ठेवले आहे. त्यांना मिळालेले ज्ञान कोणत्याही स्थूल उपकरणामुळे नव्हे, तर साधनेने प्राप्त झाले होते. येथे ‘पिप’ तंत्रज्ञानाच्या आधारे करण्यात आलेल्या चाचणीत त्यांनी मिळवलेल्या अथांग ज्ञानातील केवळ अंशमात्र ज्ञानाची सत्यता जाणता आली. यावरूनच संतांना सूक्ष्मातून जाणलेले किती योग्य आहे, ते लक्षात येते !’

ग्रहगणितामुळे कुंभपर्वक्षेत्रीचे गंगादी जलस्रोत आरोग्यवर्धक होणे

‘विशिष्ट तिथी, ग्रहस्थिती आणि नक्षत्र यांच्या योगावर येणार्‍या कुंभपर्वाच्या वेळी ब्रह्मांडीय ऊर्जेचा प्रभाव प्रयाग, हरिद्वार, उज्जैन, नाशिक येथील गंगादी पवित्र नद्या आणि त्यांच्या ४५ कि.मी. परिघातील सर्व जलस्रोत आकाशीय विद्युत्-चुंबकीय प्रभावाच्या चिकित्सकीय गुणांनी युक्त होतात, तसेच त्यांतील जल कुठल्याही विद्युत्र्ोधक वस्तूंच्या (लाकूड, प्लास्टिक, काच इत्यादींच्या) पात्रात ठेवूनही त्यांचा हा गुण अनेक दिवस टिकून रहातो, असे आधुनिक अवकाश वैज्ञानिक आणि भौतिकतज्ञ यांनी संशोधनाअंती मान्य केले आहे.’ यावरून ‘कुंभपर्वाच्या निमित्ताने एक मास असणार्‍या कुंभमेळ्यांना वैज्ञानिक आधार आहे’, हे लक्षात येते.’

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक