पवित्र गंगा !

संगमाच्या तटावर मोठ्या प्रमाणात परदेशी पक्षांचे आगमन

प्रयागराज येथील महाकुंभाच्या समारोपाच्या १५ दिवसांनंतर संगमाच्या तटावर मोठ्या प्रमाणात परदेशी पक्षांचे आगमन झाले. फेब्रुवारीच्या अखेरीस परत मायभूमीत जाणारे हे पक्षी १३ मार्चनंतरही परतले नव्हते. त्यामुळे पक्षीशास्त्रज्ञही आश्चर्यचकित झाले. या परदेशी पक्ष्यांचा मुक्काम वाढणे, याचा अर्थ संगमाच्या तटावरील पाणी आणि हवा शुद्ध असल्याचे प्रतीक आहे. पक्षी शास्त्रज्ञ प्रा. संदीप मल्होत्रा यांच्या म्हणण्यानुसार लॉरस रीडिबंडस प्रजातीचे हे परदेशी पक्षी प्रदूषणमुक्त जल आणि स्वच्छ हवेचे सूचक मानले जातात. हे पक्षी जर जल सुरक्षित आणि पर्यावरणासाठी अनुकुल असले, तरच मुक्काम करतात. त्यांची उपस्थिती याच गोष्टीचा संकेत देते की, महाकुंभाच्या काळात गंगेचे पाणी स्वच्छ ठेवण्याचे प्रयत्न यशस्वी झाले. गंगेत डॉल्फिनची वाढती संख्याही जल स्वच्छतेचे प्रमाण आहे. उत्तरप्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार  संगमक्षेत्रातील जल आणि वायू आधीच्या तुलनेत पुष्कळच शुद्ध आहे.

पक्षीशास्त्रज्ञ आणि पर्यावरणतज्ञ यांचा असा विश्वास आहे की, संगमाच्या परिसरात विदेशी पक्ष्यांची उपस्थिती आणि गंगेतील डॉल्फिनच्या संख्येत वाढ हे सिद्ध करते की, गंगा पूर्वीपेक्षा स्वच्छ झाली आहे. हे केवळ पर्यावरणासाठीच नाही, तर पर्यटन आणि धार्मिक श्रद्धेच्या दृष्टीनेही हे सकारात्मक संकेत आहेत. महाकुंभमेळ्यात ६० कोटी भाविकांनी स्नान केले, तरी गंगानदीचे पाणी अस्वच्छ झालेले नाही. या संदर्भातील संशोधन नागपूर येथील ‘नीरी’च्या (‘राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थे’च्या) संशोधकांनी केले आहे. यात लक्षात आले की, कोट्यवधी लोक स्नान केल्यानंतरही काही काळानंतर गंगा नदी स्वतःला मूळ स्थितीत आणते ! गंगा नदीमध्ये घाण स्वच्छ करण्याची शक्ती आहे. गंगेच्या जलात ऑक्सिजनची पातळी सामान्य नद्यांच्या तुलनेत २५ पट अधिक असते. स्नानाच्या ठिकाणापासून ५ किलोमीटर अंतरापर्यंत गंगा नदीचे पाणी पूर्णपणे शुद्ध आणि स्वच्छ दिसत आहे. जेथे लोक स्नान करतात, तिथे गंगा नदी ३-४ दिवसांत शुद्ध होते. येथे कधीच साथीचे रोग पसरत नाहीत. गंगा नदीचे पाणी अनेक वर्षे साठवून ठेवले, तरी ते खराब होत नाही. गंगाजलामध्ये अत्यंत हानीकारक बॅक्टेरियामधील (रोगाणूंमधील) आर्.एन्.ए.वर आक्रमण करून त्यांना झपाट्याने नष्ट करणारा ‘बॅक्टेरियोफेज्’ आढळतो, असे संशोधन पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉ. अजय सोनकर यांनी केले आहे. रसायन आणि जीव शास्त्रज्ञ हॅकिंग यांच्या संशोधनामुळे गंगाजलाचा वापर कॉलरासारख्या रोगांविरुद्ध प्रभावी ठरू शकतो, हे समजले. असे असतांना काही पुरो(अधो)गामी गंगा नदीचे पाणी अस्वच्छ असल्याचा दावा करून स्वतःचेच हसे करून घेतात, त्यांच्यासाठी ही सणसणीत चपराक आहे.

– सौ. अपर्णा जगताप, पुणे.