योगतज्ञ रामदेवबाबा आणि अनिल अंबानी यांना दिलेल्या भूमींवर उद्योग कधी उभे रहाणार ? – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

मुंबई, १० मार्च (वार्ता.) – योगतज्ञ रामदेव बाबांच्या पतंजली समूहाच्या ‘हर्बल अ‍ॅण्ड फूड पार्क’साठी, तसेच उद्योगपती अनिल अंबानी यांच्या उद्योगासाठी नागपूर येथील मिहान प्रकल्पामध्ये राज्य शासनाने नाममात्र दराने भूमी दिली होती; परंतु त्या भूमीवर अद्याप उद्योग उभे राहिलेले नाहीत. शेतकर्‍यांची लाखमोलाची भूमी कवडीमोल भावाने देऊनही त्यावर अद्याप उद्योग का उभे राहिले नाहीत ? त्या भूमीवर उद्योग कधी उभे रहाणार ?, असा प्रश्‍न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत १० मार्च या दिवशी प्रश्‍नोत्तरात उपस्थित केला. आमदार सदा सरवणकर यांनी हा प्रश्‍न विचारला होता.

या संदर्भात पटोले म्हणाले की, मिहान प्रकल्पामधील २३० एकर भूमीवर योगतज्ञ रामदेवबाबांचा ‘पतंजली समूह हर्बल अ‍ॅण्ड फूड पार्क’ची निर्मिती करणार होता. योगतज्ञ रामदेवबाबांना ही भूमी ६६ वर्षांसाठी अतिशय कवडीमोल भावात दिली होती. या उद्योगामुळे ५० सहस्र रोजगार निर्मिती होईल, तसेच प्रतीदिन ५ सहस्र कोटी रुपयांचा कच्चा माल खरेदी केला जाईल, असा दावा करण्यात आला होता; परंतु ४ वर्षे झाली, तरी अद्याप या भूमीवर पतंजलीचा उद्योग उभा राहिलेला नाही. अनिल अंबानी यांच्या ‘रिलायन्स डिफेन्स’ आस्थापनासाठीही मिहानमध्ये २८९ एकर भूमी देण्यात आली आहे. या उद्योगातूनही प्रत्यक्ष २ सहस्र, तर अप्रत्यक्ष १५ सहस्र रोजगारनिर्मिती होईल, असा दावा करण्यात आला होता; पण हा प्रकल्पही अद्याप उभा राहिलेला नाही.

नाना पटोले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, योगतज्ञ रामदेवबाबा, अनिल अंबानी यांच्यासह ज्यांना ज्यांना उद्योग निर्मितीसाठी शासनाने भूमी उपलब्ध करून दिल्या; पण त्या भूमीवर उद्योग उभे राहिले नाहीत. त्याची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करू.