
कोल्हापूर, ८ मार्च (वार्ता.) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प कोणत्या क्षणी काय निर्णय घेतील ?, याविषयी संपूर्ण जग चिंतेत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग कोणता निर्णय घेतील ?, हा त्यापेक्षा चिंतेचा विषय आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन हे काहीच बोलत नाहीत; मात्र थेट कृती करतात, तर कोरियाचे ‘किम जो’ यांचे काय करतात ?, ते सांगता येत नाही. त्यामुळे संपूर्ण जग आज आर्थिक, राजनैतिक, सामाजिक आणि सामरिक आव्हानांना सामोरे जात आहे. जागतिक स्तरावर आज सत्य चिरडले जात आहे. अशा स्थितीत भारताची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी प्रत्येक भारतियाला स्वयंपूर्ण अणि सशक्त बनावे लागेल, असे विधान योगऋषी स्वामी रामदेवबाबा यांनी केले.
ते गांधी मैदान येथे ८ मार्च या जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने ‘पतंजलि योग समिती’च्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात बोलत होते. या प्रसंगी भाजपचे खासदार धनंजय महाडिक, ‘भागिरथी महिला संस्थे’च्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक, केंद्रीय प्रभारी साध्वी देवप्रियाजी, सन्मती मिरजे, चंद्रशेखर खापणे, ‘हिल रायडर्स’चे प्रमोद पाटील, स्वामी विदेहदेव यांच्यासह सहस्रो महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य महिला वरिष्ठ राज्य प्रभारी सुधाताई अळ्ळीमोरे यांनी केले.
योगऋषी स्वामी रामदेवबाबा यांच्याकडून महाडिक दांपत्याचे कौतुकआपल्या मार्गदर्शनात योगऋषी स्वामी रामदेवबाबा यांनी भाजप खासदार धनंजय महाडिक आणि त्यांच्या पत्नी सौ. अरुंधती महाडिक यांचे कौतुक केले. या दोघा पती-पत्नी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कष्ट घेतले आणि हे एक आदर्श दांपत्य आहे, अशा शब्दांत त्यांचा गौरव केला. |
प्रारंभी योगऋषी स्वामी रामदेवबाबा आणि उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते कुमारीका पूजन करण्यात आले. योगऋषी स्वामी रामदेवबाबा पुढे म्हणाले, ‘‘आपण सनातन संस्कृतीत विश्वास ठेवतो, ज्यात एक परमेश्वराचे निर्गुण निराकार रूप आहे, जे डोळ्यांना दिसत नाही. दुसरे जे डोळ्याला जे दिसते ते मातृरूप आहे. जी आई ९ महिने आपल्याला गर्भात सांभाळते, अशा महिलेकडे आपण सर्वांनी आदर, गौरव, सन्मानाच्या दृष्टीने पाहिले पाहिजे. त्यांचे सशक्तीकरण झाले पाहिजे, त्यांचा स्वाभिमान टिकला पाहिजे, यासाठीच ‘पतंजलि योग समिती’ प्रयत्नशील आहे.’’
प्रत्येकाने योग करणे आवश्यक ! – योगऋषी स्वामी रामदेवबाबाप्रत्येकाने योग करणे अत्यंत महत्त्वाचे असून त्या माध्यमातूनच आपण निरोगी राहू शकतो. निरोगी शरीर पुढे राष्ट्र उभारणीत महत्त्वाचे कार्य करेल. या प्रसंगी योगऋषी स्वामी रामदेवबाबा यांनी काही प्राणायामांचे प्रकार करून दाखवले आणि काही उपस्थित महिलांकडून करवून घेतले. ‘हे प्राणायाम केल्यास साखर, उच्च रक्तदाब यांसह अनेक रोगांपासून आपण दूर राहू शकतो’, असे त्यांनी सांगितले. |
स्वातंत्र्यानंतर आपल्याला अद्यापही खरा इतिहास शिकवला जात नाही !
या प्रसंगी योगऋषी स्वामी रामदेवबाबा म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यानंतर आपल्याला अद्यापही खरा इतिहास शिकवला जात नाही. औरंगबेज, अकबर, तसेच मोगल यांचाच इतिहास शिकवला जातो, तर महान भारतीय संस्कृती, गौरवशाली परंपरा, क्रांतीकारक आणि पराक्रमी भारतीय राजे यांचा इतिहास समोर येत नाही. त्यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांना लहानपणापासून योग्य शिक्षण द्यावे लागेल. ते काम ‘भारतीय शैक्षणिक बोर्ड’ करत आहे.’’
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘शिवाजी विद्यापिठा’च्या नामविस्तारासाठी होणार्या मोर्चाचे निमंत्रण![]() या मेळाव्याच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या सौ. साधना गोडसे यांनी ‘भागिरथी महिला संस्थे’च्या अध्यक्षा सौ. अरुंधती महािडक, तसेच ‘पतंजलि योग समिती’चे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘शिवाजी विद्यापिठा’च्या नामविस्तारासाठी होणार्या मोर्चाचे निमंत्रण दिले, तसेच उपस्थित महिलांना हस्तपत्रके देऊन मोर्च्याला येण्याचे आवाहन केले. विषय ऐकल्यावर सौ. अरुंधती महाडिक म्हणाल्या, ‘‘शिवाजी विद्यापिठाचा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असा व्हावा, अशी सर्वांचीच इच्छा आहे. योगऋषी स्वामी रामदेवबाबा यांनीही तशीच इच्छा व्यक्त केली आहे. १७ मार्चला या संदर्भात जो मोर्चा होत आहे, त्या माध्यमातून शासनपर्यंत तूमचा आवाज निश्चित जाईल आणि शासन स्तरावर लवकरच हा निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा मी व्यक्त करते.’’ |

विशेष घडामोडी
१. मार्गदर्शनापूर्वी सकाळी उपस्थित महिलांकडून कुंकूर्माचन करून घेण्यात आले.
२. व्यासपिठावर आल्यावर प्रारंभी योगऋषी स्वामी रामदेवबाबा यांनी श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. मान्यवरांच्या हस्ते कयपंजीने दीपप्रज्वलन करण्यात आले.
३. या प्रसंगी ‘शंभूराजे मर्दानी आखाडा’ यांच्या वतीने मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. ही प्रात्यक्षिके पाहिल्यावर योगऋषी स्वामी रामदेवबाबा यांनी प्रात्यक्षिके दाखवणार्यांना व्यासपिठावर बोलावून त्यांचा विशेष गौरव केला.
४. या वेळी साध्वी देवप्रियाजी यांनी सर्व महिलांना ‘स्वदेशीचे व्रत आचरा आणि स्वदेशी वस्तू विकत घ्या’, असे आवाहन केले.