Patanjali Mega Food and Herbal Park : मोगल नव्हे, क्रांतीकारकच महान होते ! – योगऋषी रामदेवबाबा

  • ‘पतंजलि मेगा फूड आणि हर्बल पार्क’चे उद्घाटन !

  • इतिहासाच्या पुस्तकातून भारतीय संस्कृती जाणीवपूर्वक हटवण्यात आल्याचा आरोप !

नागपूर – मोगल नव्हे, तर देशासाठी सर्वस्व अर्पण करणारे क्रांतीकारक महान होते; परंतु शालेय अभ्यासक्रमात मोगलांचा इतिहास शिकवला गेला. इतिहासाच्या पुस्तकातून भारतीय संस्कृती जाणीवपूर्वक हटवण्यात आली. आपण आपली समृद्ध भारतीय संस्कृती विद्यार्थ्यांना शिकवू शकलो नाही. अभ्यासक्रमातून सनातन धर्माचे शिक्षण द्यायला हवे होते. वेददर्शन, उपनिषद शिकवायला हवे होते, असे प्रतिपादन योगऋषी रामदेवबाबा यांनी येथे केले. येथील मिहान परिसरात ‘पतंजलि मेगा फूड आणि हर्बल पार्क’चे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्या वेळी योगऋषी रामदेवबाबा बोलत होते.

ते पुढे म्हणाले,

‘‘चुकीची शिक्षणव्यवस्था पालटण्याची आवश्यकता होती. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात भारतीय शिक्षणपद्धती पालटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगदान दिले.’’

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या संकटावर मात करण्यासाठी १० वर्षांपूर्वी योगऋषी रामदेवबाबांना ‘पतंजलि’चे ‘मेगा फूड प्रोसेसिंग युनिट’ नागपूर येथे उभारावे’, अशी विनंती केली होती. या विशाल कार्याचा शुभारंभ झाला. या माध्यमातून विदर्भातील शेतकरी समृद्धीची कास धरतील.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘पतंजलि’चे केंद्र विदर्भातील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरेल. पुढील काही दिवसांत संत्रीसह सर्वच फळांचे ‘प्रोसेसिंग’ चालू होईल. विदर्भात मेगा फूड पार्क असावे, अशी आमचीही इच्छा होती. आता ‘पतंजलि’च्या माध्यमातून सर्वांना दीर्घकाळासाठी संत्रींची साठवणूक करता येईल. त्यामुळे पिकांची नासाडी टळेल.’’

नागपूरची भूमी अध्यात्मासह क्रांतीची भूमी ! – आचार्य बालकृष्ण, व्यवस्थापकीय संचालक, पतंजलि आयुर्वेद लिमिटेड

आचार्य बालकृष्ण

नागपूरची भूमी अध्यात्म आणि क्रांतीची भूमी आहे. ती देश आणि राज्यघटना यांना मूर्त स्वरूप देणारी आहे. आता या भूमीतून ‘पतंजलि’च्या नवकृषी क्रांतीद्वारे देशातील शेतकर्‍यांच्या समृद्धीचे दरवाजे उघडले जातील. येथील ‘मेगा फूड आणि हर्बल पार्क’ हे खाद्य प्रक्रिया क्षेत्रातील ‘सिंगल पॉईंट’ आणि आशियातील सर्वांत मोठे युनिट आहे.