
कोल्हापूर, ८ मार्च (वार्ता.) – कोणत्याही महापुरुषांची नावे ही गौरवानेच घेतली गेली पाहिजेत. कोल्हापूर येथील विद्यापिठाच्या नावात जर केवळ ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख असेल, तर त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरव होत नाही. त्यामुळे ‘शिवाजी विद्यापिठाचा’ नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असा झालाच पाहिजे. जे राज्यकर्ते आज सत्तेत सहभागी आहेत, त्या राज्यकर्त्यांनी स्वत:हून हा पालट करणे अपेक्षित आहे. खरेतर यासाठी आंदोलनाची आवश्यकताच नाही, असे मत योगऋषी स्वामी रामदेव बाबा यांनी व्यक्त केले. ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. ‘शिवाजी’ विद्यापिठाच्या नामविस्तारासाठी मोठे आंदोलन उभे राहिले असून त्यासाठी १७ मार्चला मोर्चा होणार आहे. त्या संदर्भात त्यांचे मत दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराने विचारले असता त्यांनी हे उत्तर दिले.