यंदाच्या अर्थसंकल्पात पुणेकरांच्या आरोग्यासाठी १ सहस्र कोटी रुपयांची तरतूद !

पुणे – कोरोनाच्या वाढत्या संसर्गापासून धडा घेत यंदाच्या अर्थसंकल्पात पुणेकरांच्या आरोग्यासाठी १ सहस्र कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ऑस्ट्रियातील ‘वॉमेड’ या संस्थेच्या निधीतून बाणेर येथे नानाजी देशमुख कॅन्सर रुग्णालय बांधण्याचे प्रस्तावित केले आहे.

स्थायी समितीने महापालिकेच्या निधीतून आणि खासगी भागीदारीतून शहरातील आरोग्यव्यवस्था सशक्त करण्यासाठी भरीव तरतूद केली आहे. यामध्ये सुपर स्पेशालिटी यूरोलॉजी हॉस्पिटलची बांधणी,  महापालिकेचे पहिले वैद्यकीय महाविद्यालय, स्तन आरोग्य तपासणी कार्यक्रम, आधुनिक तंत्रज्ञानाने हृदयरोगाचे निदान, महापालिकेच्या पाचही विभागातील रुग्णालयात अतीदक्षता विभाग, पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना, मुकुंदराव लेले दवाखान्याचे विविध वैद्यकीय सेवांसाठी अद्ययावतीकरण, आरोग्य वर्धन प्रकल्प, मधुकर बिडकर रक्तपेढी प्रकल्प, स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी हृदयरोग चिकित्सा सुविधा, तसेच मानसिक रुग्णांसाठी समुपदेशन केंद्राचा यामध्ये समावेश आहे.