‘जी फळझाडे आणि ज्या भाज्या सांडपाण्याच्या सहवासात वाढतात, त्यांमध्ये शरिराला घातक असणारे विषाणू निर्माण होतात’, असे विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधनांतून सिद्ध झाले आहे. सांडपाण्याच्या सहवासात वाढणारी झाडे आणि भाज्या यांच्या मुळांमधून सांडपाण्यातील विषारी घटक शोषले जातात. अशी फळे आणि भाज्या यांतील विषाणुंमुळे अतिसार, कॉलरा, विषमज्वर इत्यादी आजार बळावतात. त्यामुळे ती फळे आणि भाज्या खाण्यास अयोग्य असतात. त्याचप्रमाणे ‘जी फळे अन् भाज्या सांडपाण्यावर वाढतात, त्यांची चव आणि गुणवत्ता ही अत्यंत अल्प दर्जाची असते’, असेही संशोधनातून समोर आले आहे.
याविषयी सरकारने ठोस कृती करणे अत्यावश्यक आहे. सांडपाण्याचा योग्य निचरा होेण्यासाठी व्यवस्था करणे, तसेच शेती, फळबागा इत्यादींमध्ये सांडपाणी मिसळणार नाही, या दृष्टीने काळजी घेऊन त्यासंबंधी व्यवस्थापकीय उपाययोजना करणे, हे शासनाचे दायित्व आहे. उत्पन्नाचे साधन नसणारे बेरोजगार सांडपाण्यावर वाढणार्या झाडांची फळे आणि भाज्या अनेकदा बाजारात विकण्यास आणतात. त्यामुळे सरकारने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सतर्कतेने विचार करायला हवा. यावर उपाययोजना म्हणून ‘सांडपाण्याच्या बाजूला वाढणारी फळे आणि भाज्या यांची वाढ होण्यापूर्वीच त्या नष्ट करायला हव्यात किंवा त्यांच्या भोवती कुंपण घालून ती फळे अन् भाज्या कुणालाही तोडता येणार नाहीत’, याची काळजी घ्यायला हवी. असे असले, तरी ‘शासन आणि अन्न व औषध प्रशासन हे या प्रकरणी कोणतीही कार्यवाही करणे तर सोडा; पण साधी जनजागृतीही का करत नाही ?’, असा प्रश्न निर्माण झाला आहे.’
– अश्विनी कुलकर्णी, समन्वयक, आरोग्य साहाय्य समिती.