पुणे-सोलापूर महामार्गावरील अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड

पुणे – पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील थेऊरफाटा येथील हॉटेल मॅजेस्टिक या हॉटेलवर धाड टाकून तेथे अवैधरित्या चालणार्‍या हुक्का पार्लरवर कारवाई करत ४४ सहस्र रुपयांचे साहित्य जप्त केले. ही कारवाई २४ फेब्रुवारी या दिवशी केली. या प्रकरणी मालक हनुमंत भगवान तुपे यांच्यासह ६ जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

हॉटेल मॅजेस्टिकमध्ये हॉटेल आणि लॉजिंगच्या नावाखाली मटका, जुगार, हुक्का पार्लर, मद्य पार्टी, प्रेमी युगुलांसह वेश्या व्यवसाय यांसारखे अवैध व्यवसाय राजरोस चालू असल्याची बातमी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना मिळाली होती. दळणवळण बंदीच्या काळात याच हॉटेलमधील जुगार खेळणार्‍या ११ जणांना कोरोनाची लागण झाल्याची घटनाही समोर आली होती.