कळसुत्री लोककलेतील योगदानासाठी पिंगुळी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील परशुराम गंगावणे यांना पद्मश्री पुरस्कार घोषित

श्री. परशुराम गंगावणे आपल्या दोन कळसुत्री बाहुल्यांसह

कुडाळ – कळसुत्री लोककलेतील योगदानासाठी कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील परशुराम गंगावणे यांना प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार घोषित झाला आहे. प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील सिंधुताई सपकाळ, गिरीश प्रभुणे, नामदेव कांबळे, रजनीकांत श्रॉफ आणि जसवंतीबेन पोपट यांनाही पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

परशुराम गंगावणे

परशुराम गंगावणे हे पिंगुळी-गुढीपूर येथील आहेत. ठाकर समाजाच्या लोककला जतनात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. चित्रकथी, कळसुत्री बाहुल्या या आदिवासी ठाकर समाजाच्या पारंपरिक लोककलेचे जतन आणि प्रसार करण्याचे काम गेली ४५ वर्षे ते करत आहेत. देशभरात कळसुत्री बाहुल्यांचे खेळ त्यांनी केले, तर कळसुत्री कलाप्रकाराचे जतन व्हावे, यासाठी पिंगुळी-गुढीपूर येथे त्यांनी कला आंगण संग्रहालयाची निर्मिती केली. हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले आदिवासी लोककला संग्रहालय आहे. या संग्रहालयात सिंधुदुर्गातील ठाकर आदिवासी समाजाच्या पारंपरिक लोककला कळसुत्री बाहुल्या, चित्रकथी, चामड्याच्या बाहुल्या, पांगुळ बैल, डोना वाद्य, गोंधळ, पोतराज अशा लोककलांची मांडणी केली आहे. ही लोककला जतन करण्याचे गंगावणे यांचे कार्य त्यांचे दोन्ही चिरंजीव एकनाथ आणि चेतन करत आहेत.

पालकमंत्री उदय सामंत यांनी भेट घेऊन केले कौतुक

पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या रूपाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचले असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. गंगावणे यांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री सामंत यांनी २६ जानेवारीला पिंगुळी येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्या वेळी पालकमंत्री उदय सामंत बोलत होते.