रामसेतूच्या संशोधनाला पुरातत्व विभागाची संमती !

इतकी वर्षे पुरातत्व विभागाच्या हे लक्षात का आले नाही ? हिंदूंची ऐतिहासिक आणि पुरातन मंदिरे अन् वास्तू यांविषयी पुरातत्व विभाग नेहमीच निष्काळजी राहिला आहे. रामसेतूच्या संदर्भातही हेच दिसून येते !

नवी देहली – भारतीय पुरातत्व विभागाने रामसेतूच्या संदर्भातील संशोधनाला संमती दिली आहे. या विभागाच्या ‘सेंट्रल अ‍ॅडवायजरी बोर्ड’च्या ‘सी.एस्.आय.आर्.- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी’च्या एका प्रस्तावाला संमती देण्यात आली आहे. या प्रस्तावामध्ये या इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ रामसेतूचे संशोधन करणार आहेत. याद्वारे समुद्रात जाऊन रामसेतू किती प्राचीन आहे, याचा शोध घेण्यात येणार आहे. रामसेतू ४८ किलोमीटर लांब आहे.

१. पुरातत्व विभागाचे प्रा. सुनीलकुमार सिंह यांनी सांगितले की, शास्त्रज्ञ ‘रेडियोमॅट्रिक’ आणि ‘थर्मोल्यूमिनेसेंस’ डेटिंगवर आधारित संशोधानातून रामसेतू कधी बनवण्यात आला, याचा शोध घेतील. तसेच ‘रामसेतूमधील दगडांची शृंखला कशी बनली आहे ?’, हेही जाणण्याचा प्रयत्न केला जाईल.

२. या संशोधनासाठी ‘सिंधु संकल्प’ किंवा ‘सिंधु साधना’ या नौकांचा वापर करण्यात येण्याची शक्यता आहे. या नौका समुद्रात ३५ ते ४० मीटर खोल जाऊन तेथील नमुने गोळा करू शकतात. यातून ‘रामसेतू बनवण्यात आल्याच्या काळात तेथे वस्ती होती का ?’ हेही शोधण्याचा प्रयत्न होणार आहे.