नववर्षारंभाच्या नावाखाली ३१ डिसेंबरच्या रात्रीचे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे प्रशासन आणि पोलीस यांना निवेदन

मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलझारीलाल फडतरे (डावीकडे) यांना निवेदन देतांना समितीचे बळवंत पाठक, धर्मप्रेमी संदीप आबोजवार आणि भूषण पाठक

मुंबई – ३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात धूम्रपान, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन आदी केले जाते. तसेच या रात्री मद्यपान करून भरधाव वाहने चालवल्याने अपघातही होतात. गंभीर गोष्ट म्हणजे ३१ डिसेंबरच्या रात्रीपासून मद्य पिण्यास आरंभ करणार्‍या युवा पिढीचे प्रमाण लक्षणीय असून यामध्ये अल्पवयीन मुले आणि महिला यांचाही समावेश आहे.

रात्रभर मोठ्या आवाजाचे फटाके उडवून प्रदूषण करणे, तसेच कर्णकर्कश ध्वनीवर्धक लावणे, अश्लील अंगविक्षेप करून नाचणे, शिवीगाळ करणे, महिलांची छेडछाड-विनयभंग-बलात्कार आदींमुळे कायदा अन् सुव्यवस्था यांच्या दृष्टीने गंभीर स्थिती निर्माण होत आहे. त्याचा अतिरिक्त ताण पोलीस आणि प्रशासन यांवर येतो. यासाठी ३१ डिसेंबर या दिवशी राज्यातील किल्ले, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, धूम्रपान करणे, पाट्या करणे आणि सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास प्रतिबंध करण्याचा आदेश काढावा, तसेच या ठिकाणी कायदा-सुव्यवस्था राखली जावी, यासाठी पोलीस दलाचे नियोजन करण्याची मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले आहेत.