आपत्काळाविषयी साधकांना पडलेले प्रश्‍न आणि त्यांवरील योग्य दृष्टीकोनांविषयी एका साधकाचे झालेले चिंतन !

‘आपत्काळ कितीही तीव्र असला, तरी त्यातून तरण्यासाठी योग्य प्रकारे साधना करणे अनिवार्य आहे’, याची साधकाला झालेली जाणीव !

यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या दोन भागांमध्ये भगवंताशी एकरूप होण्यासाठी गुर्वाज्ञेचे पालन करणे, शहर सोडून गावाकडे जाण्याने होणारे विविध लाभ लक्षात घेणे, ‘आपत्काळानंतरची स्थिती कशी असणार आहे ?’, याची आता बुुद्धीने कल्पना करणे अशक्य असल्याने वर्तमानात राहून गुर्वाज्ञापालन करणे आवश्यक असणे आणि कालमाहात्म्यानुसार वर्ष १९९९ पासून सूक्ष्मातून आपत्काळाला आरंभ झाला असणे आणि साधकांचे सर्व त्रास परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतःवर घेतलेले असणे यांविषयी वाचले. या लेखाच्या पुढचा अंतिम भाग येथे देत आहोत.

(भाग ३)

भाग २. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/432906.html


१. ‘आगामी आपत्काळात गावाकडे जाणे का आवश्यक आहे ?’, या संदर्भात पाठवलेले लिखाण मानसिक आणि बौद्धिक स्तरावरील आहे’, हे लक्षात येणे

‘परात्पर गुरु डॉक्टर, ‘आगामी आपत्काळात गावाकडे जाणे का आवश्यक आहे ?’, या संदर्भातील लिखाण पाठवल्यानंतर मला सेवेतून आनंद मिळाला नाही. ‘लिखाणात काहीतरी राहिले आहे, काहीतरी चुकले आहे’, असे मला जाणवू लागले. लिखाण पुन्हा २ – ३ वेळा वाचल्यानंतर ‘सर्व लिखाण हे मानसिक आणि बौद्धिक स्तरावरील आहे’, असे मला जाणवले. आपल्या कृपेनेच मला ही जाणीव झालेली आहे. लिखाण वाचत असतांना आपल्या मार्गदर्शनातील एक वाक्य आठवले, ‘साधनेचे दृष्टीकोन नेहमी आध्यात्मिक स्तरावर असावेत. मानसिक किंवा बौद्धिक स्तरावर दृष्टीकोन दिल्यास समोरच्याचे मन आणि अहं दुखावला जाऊ शकतो.’ पाठवलेल्या लिखाणात नेमके असेच झाले आहे. परात्पर गुरु डॉक्टर, ‘माझ्या बुद्धीचा अहं आणि त्याचा साधनेत कसा अडथळा होतो ?’, याची जाणीव करून दिल्याविषयी आपल्या चरणी अनंत कृतज्ञता !

श्री. मंदार जोशी

२. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सूचनेची चौकट पूर्ण वाचल्यानंतर आपत्काळाविषयी पूर्वसिद्धता करायची असून प्रत्यक्ष स्थलांतर लगेच करण्याविषयी उल्लेख नसल्याचे लक्षात येणे

परात्पर गुरु डॉक्टर, यानंतर पुन्हा सदर चौकट वाचली आणि ‘आम्हा साधकांचा गोंधळ कुठे झाला आहे ?’, हे आपण लक्षात आणून दिले. सदर चौकट वाचल्यावर ‘आता पुढील ५ मासांत आहे ते सर्व सोडून आणि शहरांमध्ये असलेली घरे विकून आपल्याला गावाकडे जावे लागणार’, असे आम्हा साधकांना वाटत आहे.

सदर लेखात ‘जागतिक स्तरावर आपत्काळ कोणकोणत्या प्रकारे येऊ शकतो ?’ आणि याचा अधिक फटका महानगरे अन् मोठी शहरे यांना बसू शकतो. त्यामुळे आपली हानी टाळण्यासाठी सुरक्षित वातावरणात जाण्याचा विचार करावा’, असे सांगितले आहे (‘सर्वांनी जावे’, असा उल्लेख नाही.), तसेच ‘ज्यांची गावाकडे घरे, जागा आहे, त्यांनी आणि गावाकडे रहाण्याचा विचार करणार्‍यांपैकी ३ – ४ जणांनी गाव निवडणे, तेथे घर बांधणे किंवा विकत घेणे’, अशा कृती करण्यास सांगितले आहे. पुढील ५ मासांत सदर प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे. स्थलांतर करण्यास सांगितलेले नाही.

३. साधकाची झालेली विचारप्रक्रिया

परात्पर गुरु डॉक्टर, यानंतर माझ्या मनाची पुढील विचारप्रक्रिया झाली. ती आपल्या चरणी पाठवत आहे. ‘यात योग्य-अयोग्य काय आहे ?’, याचे मार्गदर्शन करून या पामरावर कृपा करावी.

प्रश्‍न : आगामी आपत्काळ हे समष्टी प्रारब्ध आहे. ते आपल्याला भोगावे लागणार. आपण आपले व्यष्टी प्रारब्ध टाळू शकत नाही, मग समष्टी प्रारब्ध कसे टाळता येईल ?

उत्तर : साधनेने सर्वकाही टळू शकते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

प्रश्‍न : साधकाला समाजऋण फेडायचे असते. समाज म्हणजे भगवंताचे व्यापक रूपच आहे. आपल्या आवश्यकता समाजातील कुणीतरी पूर्ण करत आहे. या समाजामुळेच आपली व्यष्टी आणि समष्टी साधना होत आहे. समाज नसेल, तर आपण गुरुसेवा आणि धर्मकार्य कसे अन् कुठे करणार ? मग या समाजापासून दूर जाऊन कसे चालेल ?

उत्तर : जेथे जाऊ तेथेही समाज असेलच. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गुरुकृपेने साधक आपत्काळात याच समाजाला आध्यात्मिक आधार देऊन साधना आणि धर्माचरण करण्यास प्रवृत्त करू शकतात.

४. ‘आपत्काळात देवच भक्तांचे रक्षण करणार आहे’, याविषयी लक्षात आलेले प्रसंग

‘देव तारी त्याला कोण मारी ।’, तसेच ‘माझ्या भक्तांचा नाश होऊ शकत नाही’, या वचनांची मला आठवण झाली आणि त्यानंतर अनेक प्रसंग माझ्या डोळ्यांसमोरून गेले. त्यांतील काही प्रसंग येथे दिले आहेत.

अ. ‘एका संतांंना काही गुंड मारत असतात; परंतु आपल्याला ते फुले मारत असल्यासारखे जाणवत होते.’

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘गुरुकृपायोग’)

आ. ‘मुंबईतील एका साधकाला त्याने साधना करू नये; म्हणून काही गुंड मारायचे ठरवतात; परंतु २ – ३ दिवस तो साधक घरातून बाहेर पडतांना किंवा घरात जातांना गुंडांना दिसतच नाही. त्यामुळे गुंड त्याला घरात जाऊन मारायचे ठरवतात. प्रत्यक्षात साधकाला बघितल्यावर गुंडांच्या हातातील हत्यारे खाली पडतात.’

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘साधकांच्या अनुभूती’)

इ. ‘मुंबईत काही वर्षांपूर्वी विविध ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाले. तेव्हा एक साधक एका बसस्थानकावर उभा होता. त्याला ‘येथून लगेच दूर जा. येथे बॉम्बस्फोट होणार आहे’, असे कुणीतरी सतत कानांत सांगत आहे’, असे जाणवत होते. तो साधक तेथून सुरक्षित ठिकाणी गेल्यावर त्या बसस्थानकाजवळ बॉम्बस्फोट झाला.

दुसर्‍या एका ठिकाणी दुसरा साधक आपल्या नेहमीच्या वेळेप्रमाणे आगगाडीने घरी जाणार असतो. त्याला ‘नेहमीच्या वेळेच्या आधीच्या आगगाडीने पुढे जावे. येथे काहीतरी अघटित घडणार आहे’, असे सतत जाणवत असते. त्याप्रमाणे तो आधीच्या आगगाडीने निघून जातो आणि नंतर त्याला कळते, ‘त्याच्या नेहमीच्या आगगाडीमध्ये तो ज्या डब्यातून नेहमी प्रवास करत असतो, त्याच डब्यात बॉम्बस्फोट झाला आहे.’

ई. जरासंध १७ वेळा मथुरेवर आक्रमण करतो. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याच्याशी लढतो. १८ व्या वेळी जनतेला (साधकांना) त्रास नको; म्हणून आपल्या योगसामर्थ्याने तो सर्वांना द्वारकेला घेऊन जातो.

उ. असुरांसह झालेल्या युद्धात भगवंताने आपल्या भक्तांना (साधकांना) समवेत घेऊन युद्ध केले आहे आणि विजय मिळवलेला आहे. त्याने भक्तांना त्यांच्या क्षात्रधर्म कर्तव्याची जाणीव प्रत्येक अवतारात करवून दिलेली आहे.

ऊ. एक शिष्य गुर्वाज्ञेनुसार लग्न करतो. त्या वेळी तो परत श्री गुरुचरणी येण्याची अनुमती मागतो. तेव्हा श्री गुरु त्याला ‘तुझे मूल जन्माला येईल, तेव्हा माझ्याकडे परत ये’, असे सांगतात. कालांतराने त्याला मूल होते; परंतु त्या क्षणी मुलाची आई (शिष्याची पत्नी) मृत पावते. ‘आता गुरुगृही परत कसे जायचे ?’,

या विचारात तो झाडाखाली बसलेला असतो. तेवढ्यात त्याला समोरच्या झाडावर चिमणीच्या घरट्यातील लहान पिलांना मारण्यासाठी घारी आक्रमण करत असतांना दिसतात. चिमणा-चिमणी आणि घार यांच्या झटापटीत ती पिल्ले खाली गवताच्या पेंडीवर पडतात. तेव्हा तो शिष्य विचार करतो, ‘ज्याला वाचवायचे आहे, त्याला देव कसेही करून वाचवेल आणि मारायचे असेल, त्याला कसेही मारेल.’ नंतर मुलाला सोडून तो गुरूंच्या सेवेसाठी निघून जातो. (संदर्भ : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आवाजातील ‘शंकानिरसन’ ही ध्वनीफीत)

‘परात्पर गुरु डॉक्टर, या वेळी अशा अनेक प्रसंगांची मला जाणीव झाली आणि एकच गोष्ट आपल्या कृपेने पुन्हा तीव्रतेने जाणवू लागली, ‘आपत्काळ कसाही असला आणि त्याची तीव्रता कितीही असली, तरी त्यातून तरण्यासाठी योग्य प्रकारे साधना करणे अनिवार्य आहे. भगवंत आपले रक्षण करणारच आहे. त्यासाठी आपण त्याचे भक्त व्हायला हवे.’

‘भगवंताची कृपा संपादन करण्यासाठी, हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी आणि संघर्षमय अन् खडतर तपश्‍चर्या रूपी साधना करण्यासाठी आपला कृपाशीर्वाद आम्हा साधकांवर असू द्यावा’, हीच आपल्या चरणी विनम्र प्रार्थना आणि संपूर्ण शरणागतभावाने कृतज्ञता !’

(समाप्त)

– श्री. मंदार विजय जोशी, बेळगाव, कर्नाटक. (२६.९.२०२०)

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक