Malaysia Mosque Temple Row : मलेशियाची राजधानी कुआलालंपूर येथे मशीद बांधण्यासाठी १३० वर्षे जुने मंदिर पाडण्यात येणार !

कुआलालंपूर (मलेशिया) – येथील १३० वर्षे जुने देवी श्री पत्थरकलीयम्मन मंदिर पाडून मशीद बांधण्याच्या योजनेमुळे वाद निर्माण झाला आहे. ‘ज्या जागेवर हे मंदिर बांधले आहे, ती भूमी एका कापड आस्थापनाने खरेदी केली आहे आणि ती येथे मशीद बांधू इच्छिते’, असे सांगितले जात आहे. त्याचे उद्घाटन मलेशियाचे पंतप्रधान करणार आहेत.

१. १३० वर्षे जुने मंदिर देवी श्री पात्रा कलियम्मा यांना समर्पित आहे आणि ते अनेक पिढ्यांपासून भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. हे मंदिर सरकारी भूमीवर बांधण्यात आले होते. वर्ष २०१४ मध्ये ही भूमी ‘जकील’ नावाच्या कापड आस्थापनाला विकण्यात आली. या आस्थापनाचे संस्थापक दिवंगत महंमद झाकेल अहमद यांनी या भूमीवर मशीद बांधून ती मुसलमानांना भेट देण्याच्या उद्देशाने खरेदी केली होती.

२. जकील आस्थापन मंदिर समितीशी सतत चर्चा करत होती आणि मंदिर दुसर्‍या ठिकाणी हालवण्याचा खर्च उचलण्याची सिद्धताही तिने दाखवली होती. वर्ष २०२१ मध्ये या आस्थापनाला या ठिकाणी मशीद बांधण्याची अनुमती मिळाली; परंतु मंदिर हालवण्यापर्यंत मशीद बांधण्याचे काम पुढे ढकलण्यात आले. तथापि आता बातमी येत आहे की, २७ मार्च या दिवशी पंतप्रधान अन्वर इब्राहिम या नवीन मशिदीची पायाभरणी करणार आहेत.

३. धार्मिक संघर्ष टाळता यावा म्हणून मशीद दुसर्‍या ठिकाणी बांधावी, अशी लोकांची मागणी आहे. त्यांनी असा दावा केला की, मंदिराला कायदेशीर मान्यता नाही; परंतु नवीन भूमी दिली जाईल आणि धार्मिक सलोखा राखण्यासाठी साहाय्य केले जाईल.

हिंदूंमध्ये संताप

या प्रकरणामुळे मलेशियामध्ये धार्मिक समानतेबद्दल दीर्घकाळ चाललेला वाद पुन्हा चालू झाला आहे. ‘लॉयर्स फॉर लिबर्टी’ संस्थेचे कार्यकारी संचालक झैद मलिक यांनी म्हटले की, ‘मंदिर, जकील आणि नगरपालिका यांच्यात अजूनही चर्चा चालू असतांना मशीद बांधण्याची इतकी घाई का ?’ त्यांनी पंतप्रधान अन्वर यांच्यावर मंदिर हटवण्याची घाई करत असल्याचा आरोप केला.

मंदिर हटवणे स्वीकारता येणार नाही ! – उरीमाई पक्षाचे नेते पी. रामासामी

उरीमाई या मलेशियातील भारतियांच्या हक्कांसाठी लढणार्‍या पक्षाचे पी. रामासामी यांनी मंदिराचे वर्णन ‘मलेशियाच्या स्वातंत्र्यापूर्वीचे एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ’ असे केले आणि ‘ते हटवणे अस्वीकार्य आहे’, असे म्हटले आहे. त्याच वेळी, काही मलय मुसलमानांचा युक्तीवाद आहे की, भूमीच्या नवीन मालकाला त्याचे धार्मिक अधिकार वापरण्याची अनुमती दिली पाहिजे.

मी कोणतेही मंदिर पाडतांना पाहू शकत नाही ! – पंतप्रधान अन्वर इब्राहिम

पंतप्रधान अन्वर इब्राहिम म्हणाले की, मंदिराच्या बांधकामाला कायदेशीर मान्यता नाही; परंतु ‘जकील’ आस्थापन मंदिर अन्य ठिकाणी हालवण्यास साहाय्य करण्यास सिद्ध आहे. नगरपालिका मंदिरासाठी दुसरी भूमी शोधत आहे. मी कोणतेही मंदिर पाडतांना पाहू शकत नाही.

संपादकीय भूमिका

इस्लामबहुल मलेशियामध्ये याहून वेगळे काय होणार ?