काश्मीरवरून भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानला पुन्हा फटकारले

न्यूयॉर्क (अमेरिका) – जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील. पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या भूभागावर बेकायदेशीरपणे नियंत्रण ठेवले आहे, जे त्याने सोडायला हवे, अशा शब्दांत भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकला सुनावले. पाकने नेहमीप्रमाणेच येथे जम्मू-काश्मीरचे सूत्र उपस्थित केले होते. त्यावर भारताने नेहमीप्रमाणेच पाकला सुनावले.
संयुक्त राष्ट्रांतील भारताचे राजदूत पी. हरीश म्हणाले की, पाकिस्तानच्या प्रतिनिधीने पुन्हा एकदा भारतीय केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरच्या संदर्भात अनुचित भाष्य केले आहे. अशा प्रकारच्या खोट्या दाव्यांना खरे ठरवले जाऊ शकत नाही. तसेच पाकिस्तान पुरस्कृत सीमेपलीकडून होणारा आतंकवाद योग्य ठरवला जाऊ शकत नाही. आम्ही पाकिस्तानला सल्ला देऊ की, त्याने त्याचे संकुचित आणि फूट पाडणारे धोरण पुढे नेण्यासाठी संयुक्त राष्ट्रांसारख्या व्यासपिठाचा वापर करू नये.
महिलांखेरीज शांतता निर्माण करणे शक्य नाही
हरीश यांनी महिला शांती सैनिकांच्या भूमिकेवर म्हटले की, महिलांखेरीज शांतता निर्माण करणे शक्य नाही. महिला शांतता निर्माण करू शकतात कि नाही ? हा आता प्रश्न राहिलेला नाही. त्याऐवजी महिलांखेरीज शांतता निर्माण होऊ शकते का ? असा प्रश्न आहे.
संपादकीय भूमिकापाकला शब्दांची नाही, तर शस्त्रांचीच भाषा समजत असल्याने त्याद्वारे भारताने पाकव्याप्त काश्मीर मुक्त करणे आवश्यक आहे ! |