अध्यात्माची शक्ती आणि भक्तांची भक्ती

स्थळ – बिहारमधील गोपालगंज येथील रामनगर. औचित्य – ‘बाबा बागेश्वर धाम’चे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या कथावाचनाचा कार्यक्रम, अर्थात् ‘दिव्य दरबार’ ! या निमित्ताने लाखो भाविक, भक्त एकत्रित आले होते. वाढणारी गर्दी आणि लोकांना होऊ शकणारा त्रास लक्षात घेऊन पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी त्या दिवशीची कथा थांबवून ‘दुसर्‍या दिवशी केवळ जवळ रहाणार्‍यांनी कथेला यावे अन् बाकीच्यांनी भ्रमणभाषवरच कथा श्रवण करा’, असे निवेदन केले; परंतु दुसर्‍या दिवशी आधीपेक्षा अधिक गर्दी झाली. पोलिसांची सुरक्षा भेदून बॅरिकेड्स तोडून भक्तांनी मंडपात शिरण्यासाठी प्रयत्न केले, अनेकांचा जीव गुदमरला, अनेकांना रुग्णालयात भरती करावे लागले. वरील वृत्त वाचल्यावर मनात पुढील विचार आले, ‘अशी गर्दी राजकीय नेते बोलावतात तेव्हा होत नाही, तर त्यांना ती जमवावी लागते ! इथे संत ‘येऊ नका’ सांगत असूनही भक्त येत आहेत. ते का ?’ जिवावर उदार होऊन भक्त कथेला जातात, यातून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे श्रद्धा किंवा भक्ती ही किती श्रेष्ठ आहे; कारण अशा गर्दीत भक्तांना त्रास होतो, म्हणून कथा थांबवणार्‍या पंडित धीरेंद्र शास्त्री यांचे लक्ष नेमके नेपाळ येथून आलेल्या एका भक्ताकडे गेले ! त्यांनी त्याला बोलावून घेतल्यामुळे त्याच्यासह सर्वांचीच ईश्वरावरील श्रद्धा नक्कीच वाढली असणार.’

या घटनेतून भगवंताने आणखी एक संदेश दिला आहे, तो म्हणजे भक्तीसमवेत धर्माची शिकवण आचरणातूनही दाखवायला हवी. आज्ञापालन, शिस्त, आदर, प्रेमभाव हे गुण भाविकांनी आचरणात आणायला हवेत; अन्यथा धर्मविरोधक अशा प्रसंगाचे भांडवल करायला टपलेलेच असतात. राजकीय सभा आणि संतांचे सत्संग दोन्हीकडे गर्दी हा विषय केंद्रस्थानी असतो; परंतु सत्संगाला एवढी गर्दी का होते ? याचा विचार व्हायला हवा. आज समाज जरी ‘रज-तमा’च्या विळख्यात अडकलेला असला, तरीही संत भक्ताला सत्त्व, म्हणजे सात्त्विकतेच्या प्रवाहात ठेवण्यासाठी प्रयत्नरत असतात. संतांची शिकवण ही सात्त्विकतेची असते, साधनेचा मार्ग दाखवणारे संत हे स्वतः साधना करत असल्याने त्यांची वाणी श्रवण करण्यासाठी भक्त आसुसलेला असतो. संतांच्या वाणीतील चैतन्य भक्ताला सांप्रत रज-तमाच्या वातावरणात जगण्यासाठी, दैनंदिन जीवनात येणारी संकटांशी लढण्यासाठी ऊर्जा देते आणि भक्ताला साधनापथावर ठेवते. हे राजकीय सभेत मिळू शकत नाही; उलट तिथे स्वार्थ, लालसा, द्वेष अशा दुर्गुणांची वाढच होण्याची शक्यता असते. थोडक्यात म्हणजे ‘मनुष्य जीवनाचे कल्याण हे साधना केल्याने होणार आहे’, याविषयीचे अमूल्य ज्ञान संत देतात. जन्मोजन्मीची कर्मे, दोष अन् अहंकार दूर करण्याची गुरुकिल्लीच जणू ते देतात. हीच ‘अध्यात्माची शक्ती आणि भक्तांची भक्ती’, असे म्हणावे लागेल !

– श्री. वैभव आफळे, गोवा.