कोरोनाच्या नवीन विषाणूच्या संसर्गाची भीती असूनही हणजूण येथे ‘रेव्ह पार्ट्यां’चे सर्रासपणे आयोजन !

सर्व यंत्रणा हाताशी असलेले पोलीस आणि प्रशासन यांना हे का दिसत नाही ? कि त्यांचे ‘रेव्ह पार्ट्या’चे आयोजन करणार्‍यांशी साटेलोटे आहे ?

पणजी, २५ डिसेंबर (वार्ता.) – कोरोनाच्या नवीन विषाणूच्या संसर्गाची आणि कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची भीती असतांना हणजूण येथे नाताळची सुटी आणि ख्रिस्त्यांचे नवीन वर्ष यांच्या पार्श्‍वभूमीवर ‘रेव्ह पार्ट्यां’चे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येत आहे. हणजूण येथील प्रसिद्ध शॅक्स आणि ‘नाईट क्लब’ येथे या पार्ट्यांचे आयोजन होत आहे.

‘रेव्ह पार्ट्यां’च्या आयोजनाविषयी हणजूण-वागातोर या समुद्रकिनारपट्टीच्या भागात ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहेत, तसेच सामाजिक माध्यमातून या पार्ट्यांचे निमंत्रण दिले जात आहे. हणजूण येथील ‘युव्ही बार’ यांनी २३ ते २६ डिसेंबर, तसेच २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत ‘रेव्ह पार्टी’चे आयोजन केले आहे. ‘कोरोनाच्या संसर्गाची भीती असतांना अशा पार्ट्यांना शासन अनुमती कशी देते ?’, असा प्रश्‍न जागरूक नागरिकांना पडला आहे. प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यांच्या संगनमतानेच या पार्ट्या होत असल्याचा आरोप केला जात आहे. म्हापसा येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रानुसार हणजूण-वागातोर परिसरातील अनेक ‘क्लब’नी नाताळाच्या सुटीसाठी रात्रीच्या वेळी ध्वनीवर्धक लावण्यासाठी अनुज्ञप्ती मागितली आहे. स्थानिकांच्या मते वागातोर येथे एका ठिकाणी काही दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी झालेल्या एका पार्टीमध्ये सुमारे १ सहस्र लोकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये पुणे, मुंबई, बेंगळुरू, भाग्यनगर, देहली आणि गुरगाव येथील पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. या पार्टीमध्ये सामाजिक अंतर पाळणे, मास्क घालणे आदी कोरोनासंबंधी सर्व मार्गदर्शक तत्त्वांना तिलांजली देण्यात आली होती.