मार्गशीर्ष शुक्ल पक्ष एकादशी (२५.१२.२०२०) या दिवशी देवद आश्रमातील श्री. सुरेश यशवंत सावंत (वय ७० वर्षे) यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
श्री. सुरेश सावंत यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. श्री. यज्ञेश सावंत आणि श्री. रमेश सावंत (मुले), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
१ अ. सातत्य आणि चिकाटी : ‘बाबा प्रतिदिन पहाटे चार वाजता उठतात. त्यानंतर ते नामजप, उपाय आणि वैयक्तिक कामे आवरून सेवेला प्रारंभ करतात. त्यांचा हा दिनक्रम गेली कित्येक वर्षे अगदी साधनेत येण्यापूर्वीपासूनच चालू आहे.’
२. श्री. यज्ञेश सावंत (मुलगा)
२ अ. देवाची पूजा आणि संतसेवा देहभान विसरून करणे
१. ‘बाबांकडे ध्यानमंदिरातील देवतांची पूजा, तसेच कधी ध्यानमंदिराची स्वच्छता, या सेवा असतात. ते देवतांची पूजा देहभान हरपून आणि भावपूर्ण करतात. त्यांना पूजा केल्यावर चांगले वाटते. पूजेची सिद्धता आणि पूजा करण्याचा कालावधी साधारणपणे ३ ते साडेतीन घंटे असतो. तेवढा वेळ ते भावस्थितीत रहाण्याचा प्रयत्न करतात.
२. त्यांच्याकडे काही मास आश्रमाच्या परिसरातील शिवमंदिराच्या पूजेची सेवा होती. ती सेवाही ते देहभान हरपून करत असत.
३. यापूर्वी त्यांना परात्पर गुरु पांडे महाराज यांची सेवा करण्याची संधी मिळाली होती. ती सेवाही त्यांनी भावपूर्ण आणि झोकून देऊन करण्याचा प्रयत्न केला.
४. एका संतांनी ‘त्यांच्यात सेवाभाव निर्माण झाला आहे’, असे सांगितले.
२ आ. मोठ्या भावाची सेवा संतसेवा म्हणून आणि दायित्व घेऊन करणे : बाबांचा मोठा भाऊ सिंधुदुर्ग येथे रहातो. त्यांचा भीषण अपघात झाल्याचे समजले. तेव्हा आम्ही कुटुंबीय काही दिवस त्यांना साहाय्य करण्यासाठी त्यांच्याकडे राहिलो होतो. तेथे त्यांनी त्यांच्या भावाची सेवा संतसेवा म्हणून तन्मयतेने केली. त्यांच्या भावाने काही साहाय्य मागितले, तर बाबा त्वरित साहाय्य करत होते. प्रत्यक्षात ते मुंबईत असतांना बाबांचे आणि त्यांचे काही ना काही कारणावरून वाद होत असत; परंतु गावी गेल्यावर बाबांनी काकांची सेवा दायित्व घेऊन केल्यामुळे कुटुंबियांना त्यांचा आधार वाटला.
२ इ. घरातील कामे आणि स्वयंपाकगृहातील सेवा यांमध्येही पुढाकार घेऊन साहाय्य केल्याने नातेवाइकांचा सनातन संस्थेविषयीचा दृष्टीकोन पालटणे अन् त्यांना संस्थेविषयी आत्मीयता वाटणे : गावी काकांकडे असतांना बाबांनी घराची स्वच्छता, प्रसाधनगृहांची स्वच्छता आणि स्वयंपाकगृहातील सेवा यांमध्येही पुढाकार घेऊन साहाय्य केले, तसेच त्यांनी कुटुंबियांना ‘सनातन संस्थेत सर्वकाही शिकवतात’, असेही सांगितले. त्यामुळे नातेवाइकांचा सनातन संस्थेविषयीचा दृष्टीकोन पालटला. पूर्वी नातेवाइकांना बाबांनी ‘चांगली नोकरी सोडून पूर्णवेळ साधना करायला नको होती’, असे वाटायचे; मात्र या वेळी बाबांच्या एकूणच वागणुकीमुळे त्यांना संस्थेविषयी आत्मीयता वाटली. कुटुंबियांनी सनातन संस्थेविषयी आस्थेने जाणून घेतले.
२ इ. तीव्र त्रास असलेल्या साधकांना परात्पर गुरु पांडे महाराज यांनी शोधून काढलेले मंत्रजप त्यांना शरण जाऊन आणि प्रार्थना करून सांगितल्याने परात्पर गुरु पांडे महाराज आतूनच योग्य मंत्रजप सुचवत असल्याचे लक्षात येणे : बाबांकडे साधकांच्या आध्यात्मिक त्रासानुसार त्यांना परात्पर गुरु पांडे महाराज यांनी शोधून काढलेले मंत्रजप सांगण्याची सेवा आहे. परात्पर गुरु पांडे महाराज यांचे महानिर्वाण होण्यापूर्वी ‘कोणत्या त्रासावर कोणती मंत्रचिकित्सा उपयोगी पडेल ?’, हे परात्पर गुरु पांडे महाराज प्रत्यक्ष सांगत असत. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या देहत्यागानंतर बाबांना प्रथम ‘स्वतःला योग्य मंत्रजप सांगणे जमेल का ?’, असे वाटत होते. तेव्हा ते परात्पर गुरु पांडे महाराज यांना शरण जाऊन प्रार्थना करत असत. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले, ‘त्यांना परात्पर गुरु पांडे महाराज ‘साधकाच्या त्रासाच्या तीव्रतेनुसार कोणता मंत्रजप द्यायचा ?’, हे आतूनच सुचवत आहेत. त्यामुळे त्यांना त्या सेवेचा ताण न रहाता ती सेवा ते चांगल्या प्रकारे करत आहेत.
२ ई. तीव्र आध्यात्मिक त्रासावर मात करण्यासाठी चिकाटीने सर्व नामजपादी उपाय करणे : बाबांना तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. त्यामुळे त्यांना संतांनी सांगितल्यानुसार आणि नाडीपट्टीनुसार नामजपादी अनेक उपाय करण्यास सांगितले आहेत. अनेक वर्षांपासून त्यांनी ते सर्व उपाय पुष्कळ चिकाटीने पूर्ण केले आणि त्यांतील काही अजूनही पूर्ण करत आहेत.
२ उ. जाणवलेले पालट
१. आता बाबांमधील स्थिरता वाढली आहे, तसेच त्यांच्या तोंडवळ्यावरील त्रासिक भाव दूर झाले असून तेज वाढले आहे.
२. नातेवाइकांमध्ये गेल्यावर ‘बाबांच्या सहवासात चांगले वाटते’, असे त्यांनी सांगितले.’
३. श्री. रमेश सावंत (मुलगा)
३ अ. तत्त्वनिष्ठ : ‘बाबांनी माझ्या साधनेच्या स्थितीविषयी स्वतःहून जाणून घेतले आहे. जेथे जेथे माझ्याकडून चुका होतात, तेथे मला भावनेच्या स्तरावर न हाताळता ते तत्त्वनिष्ठ राहून साहाय्य करतात.’ (डिसेंबर २०२०)
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |