श्री विजयादुर्गादेवीच्या भक्तांनो, धर्मांध पोर्तुगिजांचे वंशज अजूनही अस्तिवात आहेत, हे जाणून देवीचे प्राचीन तीर्थक्षेत्र पूर्णत: नष्ट होण्यापासून वाचवा !
शंखवाळी तीर्थक्षेत्र हे गोव्याचे एक प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. ते गोव्याच्या सासष्टी तालुक्यातील सांकवाळ (पूर्वीचे शंखवाळी) या गावामध्ये आहे. शंखवाळी गाव आणि त्याचे पौराणिक वैभव, याविषयी २६६ वर्षे जुन्या ‘कोंकणाख्यान’ या ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. ‘साष्टी महिमा’ या प्रकाशित पुस्तकातील अध्याय २ पृष्ठ क्रमांक ४५ ते ५६ वरील लिखाणाचे वाचन केल्यानंतर या तीर्थक्षेत्राची कल्पना येते. येथील श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर धर्मांध पोर्तुगिजांनी ५०० वर्षांपूर्वी तोडले. याच धर्मांध पोर्तुगिजांची परंपरा चर्च संस्था आणि शंखवाळी येथील ख्रिस्ती यांनी चालू ठेवली आहे, या विरोधात हिंदूंनी आवाज उठवणे आवश्यक बनले आहे.
संकलक : डॉ. कालिदास वायंगणकर, वास्तू सल्लागार
सांकवाळ येथे ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ (श्री विजयादुर्गादेवीचे पुरातन मंदिर असलेले ठिकाण) या वारसास्थळी शासनाच्या अनुज्ञप्तीशिवाय केले जाते ‘फेस्ता’चे आयोजन !
माहिती अधिकाराखाली केलेल्या अर्जातून उघड झालेली माहिती !
वास्को – सांकवाळ येथे ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ हे वारसा स्थळ आहे. या ठिकाणी शासनाच्या (पुरातत्व विभागाच्या) अनुज्ञप्तीशिवाय ८ जानेवारी ते १६ जानेवारी २०२० या कालावधीत फेस्ताचे (जत्रेचे) आयोजन केल्याची माहिती उघड झाली आहे. विशेष म्हणजे सांकवाळ येथील सेंट जोसेफ वाझ या ठिकाणच्या चर्चच्या ठिकाणी फेस्ताचे आयोजन करण्याची शासनाने अनुज्ञप्ती दिली होती; मात्र आयोजकांनी त्या ठिकाणाहून ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसास्थळाच्या ठिकाणी स्थानिकांचा तीव्र विरोध असतांना फेस्ताचे आयोजन केले. पोलीस पहार्यात आणि वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीत हे फेस्त साजरे करण्यात आले.
वारसास्थळ असल्याने या परिसरात उत्खनन करण्यास अनुज्ञप्ती नसतांनाही फेस्ताच्या वेळी ‘क्रॉस’ लावणे, ‘नोवेना’साठी (प्रार्थना सभेसाठी) मंडप घालणे आदी प्रकार केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर जागरूक नागरिक सचित नाईक यांनी १ सप्टेंबर २०२० ला माहिती अधिकाराखाली पुरातत्व विभागाकडे अर्ज करून जानेवारी २०१८, जानेवारी २०१९ आणि जानेवारी २०२० या कालावधीत सांकवाळ येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळ असलेल्या ठिकाणी सेंट जोसेफ वाझ यांचे फेस्त आणि ‘नोवेना’ यांचे आयोजन करण्यास दिलेल्या अनुज्ञप्तीची अधिकृत माहिती मागितली. २९ सप्टेंबर २०२० ला पुरातत्त्व विभागाने सचित नाईक यांना उत्तरादाखल याविषयी कोणतीच माहिती खात्याकडे उपलब्ध नसल्याचे सांगितले. यानंतर सचित नाईक यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये याविषयी दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांकडे अर्ज करून माहिती मागितली. दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांनी सांकवाळ येथील वारसास्थळाच्या ठिकाणी नाही, तर सेंट जोसेफ वाझ येथील चर्चच्या ठिकाणी ‘नोवेेना’ आणि फेस्त यांचे आयोजन करण्यास अनुज्ञप्ती दिल्याचे सांगितले.
यापूर्वी १० मार्च २०१९ या दिवशी एका रात्रीत १ मोठा आणि ५ लहान ‘क्रॉस’ अनधिकृतपणे या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. स्थानिक फादरने वर्ष २०१९ मध्ये या ठिकाणी ‘गेट’ उभारून त्याला टाळे ठोकले आहे.