विकसित गोव्याच्या पथदर्शी आराखड्याचे काम ‘चाणक्य सर्व्हिसिस लिमिटेड’ला 

‘गोवा विकसित@२०४७’ साठी नागरिकांकडून अभिप्राय मागितले

पणजी, २० मार्च (वार्ता.) – सरकारने विकसित गोव्याच्या निर्मितीसाठी पथदर्शी आराखडा सिद्ध करण्याचे काम ‘चाणक्य सर्व्हिसिस लि.’ या संस्थेला दिले आहे. हे आस्थापन आता राज्यातील विविध घटकांशी चर्चा करून आतापासून पुढील ६ मासांच्या आत सरकारला अहवाल देणार आहे. ‘चाणक्य सर्व्हिसीस लि.’ने २० मार्च या दिवशी मंत्रीमंडळासमोर यासंबंधीचे प्राथमिक सादरीकरण केले. ‘चाणक्य सर्व्हिसिस लि.’ने विकसित गोव्याचा पथदर्शी आराखडा सिद्ध करण्यासाठी नागरिकांकडून ‘क्यु-आर कोड’च्या माध्यमातून अभिप्राय आणि सूचना मागण्यास प्रारंभ केला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

मंत्रीमंडळाने गतवर्षी सप्टेंबर मासामध्ये विकसित गोव्याच्या निर्मितीचा पथदर्शी आराखडा सिद्ध करण्यासाठी ४ कोटी रुपये खर्चून सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला होता. पथदर्शी आराखड्यामध्ये गोव्याचे सामाजिक, आर्थिक आणि सर्वांगीण विकास यांच्या दृष्टीने परिवर्तन घडवण्यासाठी एक स्पष्ट आणि सुसंगत दृष्टीकोन समाविष्ट असणे अपेक्षित आहे.