आपत्कालीन दरवाजाच्या ठिकाणी सीट बसवल्यामुळे तो उघडला नाही !
पुणे – ‘हिंजवडी फेज वन’मध्ये व्योमा ग्राफिक्स आस्थापनाच्या १४ कर्मचार्यांना घेऊन जाणार्या टेंपो ट्रॅव्हलरला १९ मार्चला अचानक आग लागली. यातील काही कामगार दरवाजातून, काही कामगार काचा फोडून बाहेर पडले, तर काही आपत्कालीन दरवाजा उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. आपत्कालीन दरवाजाच्या ठिकाणी सीट बसवल्यामुळे तो उघडला नाही. त्यामुळे ४ कामगारांना जीव गमवावा लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे, तर काही घायाळांवर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. गाडीच्या मागील दरवाज्याच्या यंत्रणेत काही दोष होता का ? याचेही अन्वेषण चालू आहे. यामुळे बसमधील अंतर्गत पालट आणि कामगारांची वाहतूक करणार्या वाहनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (कामगारांची वाहतूक करणार्या वाहनांची वाहतूक पोलिसांकडून पडताळणी का केली जात नाही ? वाहनांमध्ये जादा आसने बसवली असतांना आर्.टी.ओ.कडून योग्यता प्रमाणपत्र कसे दिले जाते ? वाहतूक पोलिसांकडून कामगारांची अवैध वाहतूक करणार्या वाहनांवर कारवाई होते का ? असे प्रश्न उपस्थित होतात. या घटनेवरून अशा वाहनांमध्ये आपत्कालीन दरवाजा आणि यंत्रणा केवळ नावालाच असल्याचे स्पष्ट होते ! – संपादक)
सकाळी टेंपो हिंजवडी फेज वनमध्ये जात असतांना बसमध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागल्यावर चालक आणि समोरील कर्मचारी गाडीतून तातडीने बाहेर पडले; मात्र मागील दरवाजा उघडता न आल्याने मागच्या सीटवर बसलेल्या ४ कर्मचार्यांना बाहेर पडता आले नाही. वाहनांमध्ये आग लागल्यानंतर किंवा अपघात झाल्यानंतर प्रवाशांना लवकरात-लवकर बाहेर पडता यावे, यासाठी केंद्रीय मोटर वाहन नियमानुसार प्रत्येक प्रवासी वाहनांना आपत्कालीन दरवाजा बंधनकारक आहे; पण अनेक बसमालक जादा प्रवासी बसवण्यासाठी मूळ वाहनात पालट करून आपत्कालीन दरवाजाच्या ठिकाणी जादा सीट बसवतात. त्यामुळे आपत्कालीन दरवाजा बंद होऊन, तो उघडणे अडचणीचे ठरते. शहरातील बहुतांश कामगार वाहतूक करणार्या वाहनांमध्ये हीच परिस्थिती आहे.
पिंपरी-चिंचवड, आर्.टी.ओ.चे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितले की, हिंजवडी येथील अपघातातील वाहन तपासणीसाठी आर्.टी.ओ.त घेऊन येणार आहे. चौकशीअंती आगीची कारणे आणि कामगारांना बाहेर पडता का आले नाही ? हे समोर येईल.
अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लक्ष वेधणार !- महेश लांडगे, आमदार, भाजप
आमदार महेश लांडगे यांनी सांगितले की, प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांचे सुरक्षा पडताळणी आणि वाहनचालक, साहाय्यक यांच्या सतर्कतेबाबत उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. याबाबत राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा, यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लक्ष वेधणार आहे.