मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

मुंबई, २० मार्च (वार्ता.) – जगातील सर्वांत उंच पुतळा असा लौकिक असणार्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’सह शेकडो पुतळे घडवणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी विधानसभेत घोषणा केली. विशेष म्हणजे गेल्याच मासात राम सुतार यांचा १०० वा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात निवेदन करतांना म्हणाले की, राम सुतार हे ज्येष्ठ शिल्पकार आहेत. त्यांचे वय सध्या १०० वर्षे असून अजूनही ते शिल्प सिद्ध करण्याचे काम करत आहेत. इंदू मिल येथे निर्माणाधीन असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूतळा सिद्ध करण्याचे कामही राम सुतार करत आहेत. या पुरस्कार निवडीविषयी १२ मार्च २०२५ या दिवशी निवड समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राम सुतार यांच्या नावाला २०२४ च्या पुरस्कारासाठी मान्यता देण्यात आली. या पुरस्काराचे स्वरूप २५ लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह आणि शाल असे आहे.
राम सुतार यांनी चंबळच्या देवीची मूर्ती साकारली होती. ही मूर्ती देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत जवाहरलाल नेहरू यांना इतकी आवडली की, त्यांना भाक्रा नांगल धरणावर ब्राँझचा पुतळा बनवण्यास सांगितले; मात्र काही कारणामुळे हा प्रकल्प अपूर्ण राहिला. त्यानंतर सुतार यांनी संसदेच्या आवारात बसवण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज, मोहनदास गांधी, नेहरू, इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, भगतसिंग, अशा नेत्यांचे जवळपास १६ पुतळे बनवले आहेत.