सातारा, २० मार्च (वार्ता.) – लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा नोंद झालेल्या सातारा जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय निकम यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने नाकारला आहे. निकम यांच्यावर लाच प्रकरणामध्ये जामीन संमत करण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप झाला होता. याविषयी महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर गुन्हा नोंद केला होता.
मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती बोरकर यांच्या एकल खंडपिठाने याची सुनावणी केली. न्या. बोरकर यांनी निकम यांच्या प्रकरणात दिलासा देण्यास इच्छुक नसल्याचे सांगून याचिका फेटाळली. याविषयी सविस्तर आदेशाची प्रत नंतर उपलब्ध होईल. निकम यांनी जानेवारीमध्ये उच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज प्रविष्ट केला होता. यामध्ये स्वतः निर्दोष असल्याचा दावा केला होता. या प्रकरणांमध्ये गोवण्यात आले असल्याचेही निकम यांनी याचिकेत म्हटले होते.