गोव्यात शिक्षण खात्याच्या नियोजनाप्रमाणेच नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, २० मार्च (वार्ता.) – नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ शिक्षण खात्याने यापूर्वी घोषित केलेल्या नियोजनानुसार होणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २० मार्च या दिवशी दिली. मंत्रीमंडळ बैठकीनंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उत्तर देत होते.

नवीन शैक्षणिक वर्ष ७ एप्रिलपासून चालू करण्याच्या शिक्षण खात्याच्या निर्णयाला काही पालक आणि शिक्षक यांनी विरोध केला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात याचिका प्रविष्ट (दाखल) झाली आहे आणि यावर न्यायालयात २४ मार्च या दिवशी सुनावणी होणार आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असले, तरी न्यायालयाने सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिलेली नाही. या पार्श्वभूमीवर एप्रिल मासापासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ करण्यावर सरकार ठाम असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून स्पष्ट झाले आहे. गोवा सरकारने इयत्ता ६ वी ते १० वी आणि इयत्ता १२ वीसाठी नवीन शैक्षणिक वर्ष ७ एप्रिलपासून प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी नवीन शैक्षणिक वर्ष जून मासाच्या पहिल्या आठवड्यात प्रारंभ होत होते. नवीन शैक्षणिक वर्षाला एप्रिलपासून प्रारंभ करणे, हा नवीन शैक्षणिक धोरणाच्या कार्यवाहीचाच एक भाग आहे.