
पणजी, २० मार्च (वार्ता.) – मडगाव येथील बलात्कार प्रकरणी पीडितेने साक्ष पालटल्याने एकूणच प्रकरणाची संपूर्ण सत्यता पडताळली जाणार आहे. पोलिसांना या प्रकरणी सखोल अन्वेषण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ‘ही मानवी तस्करीची घटना आहे का ?’ याचीही पूर्ण पडताळणी करण्यात येणार आहे, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. या प्रकरणी शेजारच्या राज्यांतील मुलींना गोव्यात काम देण्याचे आमीष दाखवून नंतर त्यांची फसवणूक करण्याच्या गुन्ह्याखाली बोर्डा येथील शबरीश मांजरेकर (वय ३२ वर्षे) याला मडगाव पोलिसांनी २० मार्च या दिवशी कह्यात घेतले आहे.
दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक टिकम सिंह वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शबरीश मांजरेकर याने पीडित महिलेला मदतनीस (केअर टेकर) म्हणून चांगल्या वेतनाची नोकरी आणि रहाण्याची सोय उपलब्ध करून देण्याच्या बहाण्याने गोव्यात आणले होते. शबरीश मांजरेकर हा परवानाधारक कंत्राटदार असल्याचे भासवून कामाला लावण्याचे आश्वासन देत परराज्यांतून मुली गोव्यात आणत होता. शबरीश मांजरेकर याच्या विरोधात मानवी तस्करी आणि फसवणुकीचा गुन्हा नोंद झालेला आहे. कोंब, मडगाव येथे पीडित महिलेने १६ मार्च या दिवशी रात्री तिच्यावर ३ जणांनी अत्याचार केल्याची एका महिला अधिवक्त्याच्या माध्यमातून पोलिसांना माहिती दिली होती आणि त्यानंतर महिलेने साक्ष पालटली होती. संबंधित महिलेची गोवा वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय चाचणी केली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे उघडकीस आले होते.