संधी कुणाशी करावी ? आणि ती अयोग्य लोकांशी केल्याने होणारे दुष्परिणाम !

प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !

प्रश्न : कैश्च संधिर्न जीर्यते ?

अर्थ : कुणाशी केलेली संधी जीर्ण होत नाही ?

उत्तर : संधी : सद्भिर्न जीर्यते ।

अर्थ : सज्जनाशी केलेली संधी जीर्ण होत नाही.

संधी म्हणजे मित्रता, सख्य, तडजोड आणि तह. जीर्ण होणे, म्हणजे अकार्यक्षम होणे, नासणे, सडणे, कुजणे, मोडणे आणि निरुपयोगी होणे.

१. संधीची व्याख्या आणि सध्या संधी मोडण्याची असलेली शक्यता

‘ज्या दोन पक्षांमध्ये भांडण, मतभेद आणि संघर्ष, असे काही असते. त्यात कुणा एकाचा पूर्ण पराभव आणि दुसर्‍याचा संपूर्ण विजय होण्याची शक्यता नसते. तेव्हा उभयपक्षी काही अटी घालून त्या मान्य करून जी तडजोड केली जाते’, त्याला संधी असे म्हणतात. दोन्ही पक्ष किंवा व्यक्ती चांगल्या सज्जन असतील, तर त्यांनी केलेली ही संधी टिकून रहाते, मोडत नाही. प्रामाणिकपणा नसेल, तर संधीत स्वीकारलेल्या अटी पाळण्याची पाहिजे तेवढी दक्षता घेतली जात नाही. दोन्ही पक्ष प्रामाणिक असतील, तरच त्या अटींना काही अर्थ रहातो, असे प्रसंग विशेषतः राजकारणात उभे रहातात. संधी वारंवार होतात आणि वारंवार मोडल्याही जातात. सज्जन अटी पाळण्याचा प्रयत्न करतो, म्हणून संधी टिकून रहाते. राजकारणात सज्जन माणसे कुठून आणायची ? जे सज्जन असतात, ते बहुधा राजकारणात पडत नाहीत. जे राजकारणात पडतात, ते सहजा सज्जन असत नाहीत. ‘संधी मोडण्याची संधी शोधणे’, हेच जणू यशस्वी राजकारणाचे गमक होऊन बसले आहे.

२. दुर्याेधनाने अट न पाळल्याने ओढवलेला सर्वनाश

दुर्योधनाने पांडवांनी १२ वर्षे वनवास आणि १ वर्ष अज्ञातवास भोगल्यानंतर द्युतातील अटींप्रमाणे पांडवांचे राज्य परत करायला हवे होते. भीष्माचार्यांनी ‘पांडवांनी वनवास आणि अज्ञातवासाची वर्षे पूर्ण केली आहेत’, असा निर्वाळाही दिला होता; पण स्वार्थी आणि अहंकारी दुर्योधनाने दुष्टपणाने अटी पाळण्यास नकार दिला. पांडवांनी ५ गावांवर संतुष्ट होण्याइतके पडते घेऊनही दुर्योधनाने ‘सुईच्या टोकांवर बसेल एवढी मातीही देणार नाही’, असे उर्मटपणे सांगून युद्ध ओढवून घेतले. त्यामुळे सर्वनाश ओढवला; पण धर्मसंरक्षणासाठी तो भयानक संहारही श्रीकृष्णाने पत्करला.

३. पाकिस्तानची निर्मिती सत्तालालसेमुळे !

गेल्या ७७ वर्षांत पाकिस्तानचा अनेकदा पराभव करून आपण त्याच्याशी अनेक वेळा संधी केली. जिंकलेला भूभाग परत करण्याचे सौजन्यही दाखवले; पण पाकिस्तान कसे वागत आहे, त्याचा वाईट अनुभव प्रत्ययही येत आहे, तरी आपण निश्चित निर्णयाला येऊ शकत नाही. हिंदुस्थानचे विभाजन हाच एक मुळात अन्याय होता; पण भोंगळ तत्त्वज्ञान, काही पुढार्‍यांच्या सत्तालालसा आणि इतरांचा अगतिकपणा इत्यादींमुळे ‘अनादी कीर्ती वैभवशाली प्रिय भारत खंडित झाला.’ त्या वेळी ठरलेल्या अ‌टीप्रमाणे खंडित भारताने पाकिस्तानला ५५ कोटी रुपये (आताचे ५ सहस्र १५ कोटी ६४ लाख रुपयांहून अधिक) देण्याचे ठरले; पण तत्पूर्वी पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केले.  ‘ते मागे घेतल्याविना हे ५५ कोटी रुपये देऊ नयेत’, असा विचार हिंदुस्थान शासनाने केला. गांधीजींनी प्राणांतिक उपोषणाचा धाक दाखवून ५५ कोटी रुपये पाकिस्तानला द्यायला लावले. पाकिस्तानच्या मनोवृत्तीत काहीही पालट झाला नाही आणि आजही ते तसेच वागत आहेत. आज पुन्हा विभाजनपूर्व परिस्थिती निर्माण होत आहे. पाकिस्तान निर्मितीपूर्वीही त्या‍ वेळचे मान्यवर पुढारी ‘पाकिस्तान होणार नाही, होऊ देणार नाही. त्यासाठी तलवारीला तलवार भिडेल’, अशा घोषणा देत होते. त्याचा परिणाम म्हणून ते निवडून आले. सत्तेवर आरूढ झाले आणि पाकिस्तान झालेच. पाकिस्तान निर्मितीच्या मुळाशीही ‘अल्पसंख्यांक बहुसंख्यांकांचे आम्हाला भय आहे’, असा कांगावा हेच कारण होते. त्यांनी संतुष्ट व्हावे; म्हणून बहुसंख्यांकांचे पुढारी त्यांना अधिकाधिक सवलती देऊ करत होते, तरी पाकिस्तानची निर्मिती टळू शकली नाही.

४. आरक्षणापेक्षा काश्मीर प्रश्न महत्त्वाचा !

आज हिंदु समाजातील तरुण तात्कालिक कारणाकरता भडकून उठतात, ती वृत्ती सोडून शाश्वत हितासाठी प्रसंगी सर्वस्वाचा त्याग करून धैर्याने संघटितपणे उभे रहातील, तरच भवितव्याविषयी काही चांगली आशा करणे शक्य आहे. शासकीय आरक्षणनीती अन्याय करणारी आणि घातक आहे, प्रतिभेचा आणि योग्यतेचा नाश करणारी आहे. काश्मीर प्रश्न त्याहीपेक्षा महत्त्वाचा आहे, हे दूरदर्शीपणाने लक्षात घेऊन तरुणांनी वागले पाहिजे, नाही तर… !

– प.पू. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले)

(साभार : ग्रंथ ‘यक्षप्रश्न’)