२३ वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे धूलिवंदनासह रंगपंचमीच्या धर्मशास्त्राविषयी हिंदूंमध्ये जागृती !

खडकवासला जलाशय रक्षण अभियानाची यशस्वी सांगता !

अभियानात सहभागी धर्मप्रेमी

पुणे, २० मार्च (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी राबवण्यात येणार्‍या ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’ची १९ मार्चला यशस्वी सांगता झाली. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही हे अभियान शतप्रतिशत यशस्वी झाले. २३ वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि प्रबोधनामुळे खडकवासला परिसरात धूलिवंदन आणि रंगपंचमी या सणांमध्ये शिरलेल्या अपप्रकारांमध्ये घट होऊन धर्मशास्त्राविषयी समस्त हिंदु जागृत झाले. श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन आणि आरती करून मोहिमेला ८ वाजता आरंभ झाला. सकाळपासूनच रंग खेळून धरणावर येणार्‍यांची संख्या अत्यल्प होती. येथे भेट देण्यासाठी येणार्‍या काही नागरिकांनी त्यांचे प्रबोधन केल्यावर समितीचे सर्वच कार्य जाणून घेतले आणि काही वेळ मोहिमेत सहभागी झाले. या अभियानात महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुणे जिल्हा समन्वयक ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर मान्यवर उपस्थित होते.

मोहिमेसाठी पुणे शहर, भोर आळंदे वाडी, पिंपरी-चिंचवड, सासवड, हडपसर येथील धर्मप्रेमी नागरिक, हिंदुत्वनिष्ठ आणि समितीचे कार्यकर्ते असे ७५ हून अधिक धर्मप्रेमी प्रत्यक्ष सहभागी झाले होते.

वैशिष्ट्यपूर्ण

१. या वेळी सनातन संस्थेच्या पू. (सौ.) मनीषा पाठक यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

२. मारुति रामभाऊ माने ४० वर्षांपासून खडकवासला येथील चौपाटीवर हातगाडीतून कांदाभजी, वडे आणि अन्य खाद्यपदार्थ विक्री करत आहेत. ते म्हणाले की, पूर्वी मी एकटाच येथे व्यवसाय करत होतो. या ठिकाणी दोन्ही दिवस बहुसंख्य नागरिक रंग खेळून येत आणि धरणात उतरत. त्यामुळे या पाण्यावर लाल रंगाचा तवंग येत असे. हेच पाणी पिण्यासाठी येत होते. २२ वर्षांपूर्वी हिंदु जनजागृती समितीने ही मोहीम चालू करून मोठे समाजोपयोगी कार्य चालू केले आहे. त्यामुळे आज एकही व्यक्ती पाण्यात उतरत नाही. आरंभीच्या काळात समितीच्या या कार्याला मी स्वतः साहाय्य करत होतो. आजही मला समितीच्या कार्याचे पुष्कळ कौतुक करावे, असे वाटते.

अभियानात सहभागी धर्मप्रेमी

धूलिवंदन आणि रंगपंचमी या मोहिमेसाठी सहकार्य केलेले धर्माभिमानी !

उद्योजक श्री. नितीन जाधव, राधा कृष्ण हॉटेलचे मालक श्री. श्रीकांत शेट्टी, उद्योजक श्री. सारंगजी राडकर, उद्योजक श्री. चेतन उणेचा, खडकवासला भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष श्री. चेतन मुनी, हिंदुत्वनिष्ठ श्री. निखिल पायगुडे, श्री. मोतीलाल ओझा, श्री. विश्वजित कवडे, हरे कृष्ण सत्संग केंद्र, इस्कॉन मंदिर, हडपसर.

मोठ्या प्रमाणात अभियाने राबवण्याची आवश्यकता ! – ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, महाराष्ट्र मंदिर महासंघ, पुणे जिल्हा समन्वयक

पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी, मुळा-मुठा नदीचे प्रदूषण अत्यंत गंभीर समस्या असून त्यावर ठोस उपाययोजना निघाली नाही. समितीचे कार्यकर्ते पाण्याची हानी होऊ नये, यासाठी प्रतीवर्षी खडकवासला जलाशयाभोवती उभे रहातात. या मोहिमेमुळे जलाशयाचे प्रदूषण रोखले जात असल्याने आम्ही महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कार्यकर्ते या अभियानात सहभागी झालो. महाराष्ट्रातील नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी अशी अभियाने राबवण्याची आवश्यकता आहे.

क्षणचित्रे

१. येणार्‍या जाणार्‍या अनेक मान्यवरांनी मोहिमेचे कौतुक केले.

२. काही धर्मप्रेमी मोहिमेचा विषय ऐकून प्रत्यक्ष सहभागी झाले.