अरेरावी करणार्‍या रिक्शा-टॅक्सी चालकांच्या विरोधात ‘व्हॉट्सॲप’ क्रमांक कार्यान्वित होणार ! – परिवहनमंत्री

मुंबई – प्रवाशांना नियमबाह्य भाडे आकारणे, भाडे नाकारणे, तसेच गैरवर्तन करणारे रिक्शा आणि टॅक्सी, तसेच ओला-उबेर टॅक्सी या चालकांच्या विरोधात तक्रारीसाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रासाठी येत्या आठवड्यात एकच व्हॉट्सॲप क्रमांक कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यावर येणार्‍या तक्रारींशी संबंधित रिक्शा अथवा टॅक्सी चालकाला परिवहन विभागाने नोटीस पाठवावी. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यकता भासल्यास त्याची अनुज्ञप्ती (परवाना) रहित करण्याची कारवाई करावी, असे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत.

वांद्रे (पूर्व) चे आमदार वरुण सरदेसाई यांनी वांद्रे, खार, अंधेरी या रेल्वेस्थानकांच्या परिसरात प्रवाशांना रिक्शा आणि टॅक्सी चालकांची अरेरावी सहन करावी लागते. चालक नियमबाह्य पद्धतीने भाडे आकारतात किंवा गैरवर्तन करतात, तसेच अनेक प्रवाशांना इच्छित स्थळी सोडण्यास नकार देतात. या संदर्भात परिवहन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर बोलावलेल्या बैठकीत मंत्री सरनाईक बोलत होते. या वेळी वांद्रे (पूर्व) भागाचे लोकप्रतिनिधी वरुण सरदेसाई आणि मोटार परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.