ब्रिटीश राजवटीपासूनच हिंदु धर्मगुरुंविरुद्ध एक ठोस प्रचार यंत्रणा कार्यरत आहे. पारंपरिक गुरुकुल प्रणाली मोडीत काढण्यासाठी ब्रिटिशांनी भारतीय आध्यात्मिक व्यवस्थेला अंधश्रद्धा आणि प्रतिगामी म्हणून सादर केले. स्वातंत्र्यानंतरही नेहरू आणि काँग्रेस सरकारने साम्यवादी विचारसरणीला चालना दिली. परिणामी मार्क्सवादी विचारवंतांनी शिक्षण, माध्यमे (मिडिया) आणि साहित्य या क्षेत्रांवर प्रभाव मिळवला अन् हिंदु परंपरांविषयी नकारात्मक दृष्टीकोन रूजवण्याचे काम केले. आजच्या काळात साम्यवादी विचारवंतांनी हिंदु आध्यात्मिक गुरूंना अपकीर्त करण्यासाठी व्यापक प्रचार मोहीम राबवली आहे. माध्यमांच्या साहाय्याने सातत्याने हिंदु धर्मगुरूंविषयी नकारात्मक बातम्या आणि आरोप पसरवले जातात. न्यायसंस्थेतही विशिष्ट विचारधारेशी संबंधित असलेल्या अधिवक्त्यांकडून हिंदु गुरूंच्या विरोधात खटले प्रविष्ट (दाखल) करून त्यांना कलंकित करण्याचा प्रयत्न केला जातो.
१. सांस्कृतिक युद्ध आणि हिंदु परंपरांचा र्हास
साम्यवादी विचारसरणीच्या प्रभावाखाली भारतीय सांस्कृतिक ओळख नष्ट करण्याचे प्रयत्न चालू आहेत. शिक्षण संस्थांमध्ये हिंदु धर्म आणि परंपरांविषयी विकृत माहिती पसरवली जाते. चित्रपट, साहित्य आणि शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये हिंदु धर्मगुरूंच्या योगदानाला न्यून लेखण्याचा प्रयत्न होतो. याउलट इतर धर्मगुरूंना प्रतिष्ठा आणि संरक्षण दिले जाते. पुढील काही मुद्यांच्या माध्यमातून हिंदु धर्मगुरु आणि संस्कृती यांना लक्ष्य करण्यात येत आहे, ते लक्षात येईल.
२. प्रसारमाध्यमांची भूमिका
हिंदु धर्मगुरूंविषयी माध्यमे कठोर भूमिका घेतात, तर इतर धर्मीय नेत्यांविषयी सौम्य भूमिका घेतली जाते. उदाहरणार्थ हिंदु साधूंवर आरोप झाले की, मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली जाते; पण इतर धर्मीय गुन्हेगारांसाठी तितकीच कठोर भूमिका घेतली जात नाही. ‘भगवा आतंकवाद’सारखी संकल्पना उभी करून हिंदु संत, साधू आणि राष्ट्रवादी शक्ती यांना कलंकित करण्याचा प्रयत्न केला जातो, तसेच अनेक हिंदी चित्रपट, ‘ओटीटी’ यांवरील वेब सिरीजमधून हिंदु गुरूंना आणि संस्कृतीला नकारात्मक पद्धतीने दाखवले जाते. उदा. ‘ओ.एम्.जी.’, ‘आश्रम’ यांसारख्या वेब सिरीजमध्ये हिंदु साधूंना भ्रष्ट आणि गुन्हेगार म्हणून दाखवले जाते. पुरोगामी आणि साम्यवादी यांच्या मोहिमा, तसेच अनेक पुरोगामी अन् साम्यवादी विचारवंत हे हिंदु धर्मगुरूंना ‘अंधश्रद्धा’, ‘जातीवादाचे समर्थक’ किंवा ‘महिलाविरोधी’ म्हणून सादर करतात. काही स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्था हिंदु धर्मगुरूंच्या विरोधात चळवळी चालवतात; पण इतर धर्मांतील कर्मठतेविरोधात मात्र ते गप्प रहातात. ‘काळी शक्ती’, ‘बाबा संस्कृती’, ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या नावाखाली हिंदु गुरूंना लक्ष्य केले जाते.

३. विदेशी निधी आणि धर्मांतरविषयीच्या मोहिमा
हिंदु धर्माच्या प्रभावाला न्यून करण्यासाठी चर्च आणि इस्लामी संस्था यांच्याकडून मोठ्या प्रमाणात परदेशी निधी दिला जातो. हिंदु धर्मगुरु मोठ्या प्रमाणावर लोकांना संघटित करतात आणि धर्मांतराच्या विरोधात उभे रहातात, त्यामुळेच त्यांना लक्ष्य केले जाते. धार्मिक आणि सांस्कृतिक संस्था यांमध्ये सरकारी हस्तक्षेप करून अनेकदा हिंदु मंदिरांचे व्यवस्थापन स्वतःच्या हातात घेतात; मात्र इतर धर्मीय प्रार्थनास्थळांवर असा हस्तक्षेप नसतो. दक्षिण भारतात सहस्रो मंदिरांचे उत्पन्न सरकारकडे जाते; पण चर्च आणि मशिदी यांचे उत्पन्न स्वतंत्रपणे वापरण्याची मुभा आहे. यामुळे हिंदु मंदिर व्यवस्थापन दुर्बल होत आहे आणि त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
४. राष्ट्रीयता आणि सनातन धर्म यांचा संबंध तोडण्याचे षड्यंत्र
हिंदु धर्म हा भारतीय संस्कृतीचा मुख्य आधारस्तंभ आहे आणि अनेक संत अन् धर्मगुरु यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान दिले; मात्र आज या धर्मगुरूंना ‘संस्कृतीविरोधी’, ‘जातीयवादी’ किंवा ‘गैरव्यवहार करणारे’ म्हणून सादर करून त्यांचा प्रभाव न्यून करण्याचा प्रयत्न केला जातो. स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती यांसारख्या विचारवंतांना दुर्लक्षित करून केवळ आधुनिक, पाश्चिमात्य विचारसरणीला महत्त्व दिले जात आहे. हिंदु संत आणि गुरु यांना ‘फसवे’ आणि ‘अंधश्रद्धा पसरवणारे’ म्हणून रंगवले जाते; पण इतर धर्मगुरूंवर अशी टीका केली जात नाही. योगगुरु रामदेवबाबा यांचे ‘पतंजली’च्या माध्यमातून हिंदु योग, परंपरा आणि आयुर्वेद या संकल्पनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचवण्यात महत्त्वाचे योगदान आहे. सद्गुरु जग्गी वासुदेव हे ही पर्यावरण आणि योग या क्षेत्रात ‘ईशा फाऊंडेशन’च्या माध्यमातून जगभरातील लोकांमध्ये भारतीय संस्कृतीचे महत्त्व पटवून देण्याचे काम करत आहेत; मात्र पुरोगामी आणि साम्यवादी विचारवंतांकडून जाणीवपूर्वक वाद निर्माण केला जात असून हिंदु संस्कृती आणि साधू यांना लक्ष्य करण्यात येत आहे. हिंदु आध्यात्मिक गुरूंवर होणार्या आक्रमणांच्या विरोधात कायदेशीर आणि सामाजिक स्तरावर लढा देण्याची नवी चळवळ उभी करणे आवश्यक आहे. या व्यापक षड्यंत्राचा प्रतिकार करण्यासाठी हिंदु समाजाने बौद्धिक अन् सांस्कृतिक पातळीवर सजग होण्याची आवश्यकता आहे. हिंदु धर्मगुरूंनी केवळ आध्यात्मिक नेतृत्वच नव्हे, तर समाज सुधारणेतील योगदान लोकांसमोर मांडण्याची आवश्यकता आहे.
(साभार : ‘वायुवेग’ संकेतस्थळ, १५.३.२०२५)