महावितरणच्या ‘अभय’ योजनेला वीजग्राहकांचा प्रतिसाद
रत्नागिरी/ सिंधुदुर्ग – वीजदेयके वेळीच न भरल्याने रत्नागिरी परिमंडलातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत एकूण ३१ सहस्र १३६ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला होता. या ग्राहकांना थकबाकीतून मुक्त होऊन पुन्हा वीजजोडणी घेण्याची संधी ‘अभय’ योजनेच्या माध्यमातून महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा लाभ घेत रत्नागिरी परिमंडलातील लघुदाब आणि उच्चदाब यांच्या एकूण ७८७ वीजग्राहकांनी ६५ लाख ८० सहस्र रुपयांची थकबाकी भरली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ५४० ग्राहकांनी ५२ लाख ८६ सहस्र रुपये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २४७ ग्राहकांनी १२ लाख ९४ सहस्र रुपये, अशी ही थकबाकी आहे.
वीजदेयकांच्या थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या, तसेच कृषी आणि सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित सर्व अकृषक वीजग्राहकांसाठी महावितरणची ही ‘अभय’ योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत चालू रहाणार आहे. अधिकाधिक वीजग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.