शाळांसह मैदानावरही सीसीटीव्ही आवश्यक ! – चित्रा वाघ, आमदार, भाजप

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. शाळेच्या आवारात, तसेच मैदानावर विद्यार्थी सुरक्षित रहावेत, यासाठी सीसीटीव्ही छायाचित्रक बसवणे अनिवार्य करावे, अशी मागणी भाजपच्‍या आमदार सौ. चित्रा वाघ यांनी सभागृहात केली. त्यांनी राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थिनी आणि विद्यार्थी यांवर होत असलेल्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. विद्यार्थी शाळेत पोचल्यापासून प्रवेशद्वाराच्या बाहेर पडत नाहीत, तोपर्यंत त्यांचे संपूर्ण दायित्व हे शाळेचे आणि संस्थाचालकांचे आहे. त्यामुळे शाळेच्या आवारात अपप्रकार घडल्यास संबंधित शाळा आणि संस्थाचालक यांवर तात्काळ गुन्हा नोंद करण्याचे प्रावधान करावे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

आमदार चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की, अनेकदा अशा घटनांमध्ये शाळेत कार्यरत असलेले कंत्राटी कामगार दोषी आढळतात; मात्र शाळा प्रशासन हे कर्मचारी त्यांच्या ‘पे-रोल’वर (पगारदार) नसल्याचे सांगत दायित्व झटकते. त्यामुळे अशा प्रकरणांत शाळांवर कोणतीही कारवाई होत नाही.

चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या सूत्राविषयी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांनी एकमताने चिंता व्यक्त केली. काही आमदारांनी शाळांमध्ये शिक्षण आणि कर्मचार्‍यांची पार्श्वभूमी तपासणी बंधनकारक करण्याची सूचना मांडली.

राज्यातील सर्व शाळांत सीसीटीव्ही बंधनकारक ! – शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे आदेश

 मुंबई, २० मार्च (वार्ता.) – राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक आहे. शासकीय शाळांपैकी एकूण ५० टक्के शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. खासगी अनुदानित शाळांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी स्थानिक आमदार निधीतून पैसे देण्यात येतील का ? याविषयी सरकार विचार करील, असे निवेदन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार विक्रम काळे यांनी याविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

संपादकीय भूमिका :

विद्यार्थी-विद्यार्थिनींची सुरक्षा धोक्यात आल्यामुळे सीसीटीव्ही लावावे लागणे हे मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीचे फलीत !