दाभोली गावातील तरुणांचा शिमगोत्सवात अनोखा संदेश
वेंगुर्ला – ‘परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली कोकण भूमी पूर्वजांनी जपण्यासाठी दिली आहे, विकण्यासाठी नाही’, असा कोकणच्या भवितव्याच्या दृष्टीने अनोखा; पण महत्त्वाचा संदेश तालुक्यातील दाभोली येथील ग्रामस्थांनी शिमगोत्सवाच्या वेळी दिला.
निसर्गसौंदर्याने संपन्न असलेल्या कोकण भूमीवर आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. वाडवडिलांनी श्रम करून एक एक पैसा जमवून पुढील पिढीसाठी भूमी घेऊन ठेवली आहे. त्यांनी हा ठेवा विकण्यासाठी नाही, तर जपण्यासाठी ठेवला आहे. या भूमीत काबाडकष्ट केले, तर पिढ्यान्पिढ्यांचे भले होणार आहे. कुठल्याही परिस्थितीत भूमी विकून चालणार नाही, हे आताच्या तरुण पिढीच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच त्यांनी शिमगोत्सवाच्या निमित्ताने ही जनजागृती केली.