श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर आणि पहिले बालसंत पू. भार्गवराम भरत प्रभु यांची चित्रे काढतांना सौ. दीपा औंधकर यांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती
१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे चित्र रेखाटतांना जाणवलेली सूत्रे
अ. ‘श्रीसत्शक्ति(सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे चित्र रेखाटतांना ‘मला ते जमेल कि नाही ?’, असा विचार माझ्या मनात आला नाही.
आ. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांचे स्मरण करत अवघ्या २ घंट्यांमध्ये चित्र रेखाटले गेले.
इ. मोजमापाचे कोणतेही साधन न वापरता चित्र रेखाटता आले.
ई. चित्र रेखाटतांना आणि नंतरही पुष्कळ आनंद मिळत होता.
उ. चित्र रेखाटल्यावर अनेक दिवसांनी ज्यांना हे चित्र दाखवले, त्यांनाही त्यातून आनंद मिळाल्याचे जाणवले.
२. पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर यांचे चित्र रेखाटतांना ‘श्री सिद्धिविनायकाय नमः ।’ हा नामजप चालू होणे
‘५.९.२०२० या दिवशी मी प्रथमच व्यक्तीचित्र रेखाटणार होते. तेव्हा ‘सात्त्विक व्यक्तीचे चित्र काढूया’, असे मला वाटले; म्हणून मी चित्र शोधत असतांना बालसंत पू. वामन राजंदेकर यांचे छायाचित्र माझ्या समोर आले. त्या वेळी अन्य कोणताच विचार न करता मी पू. वामन यांचे चित्र रेखाटणे चालू केले. मला हे चित्र काढतांना अतिशय आनंद होत होता. या वेळी मला शांती जाणवली आणि माझा ‘श्री सिद्धिविनायकाय नमः ।’ हा नामजप चालू झाला. चित्र पूर्ण झाल्यानंतरही मला पुष्कळ वेळ आनंद होत होता.
३. पू. भार्गवराम भरत प्रभु यांचे चित्र रेखाटतांना ‘श्री विष्णवे नमः’ । हा नामजप चालू होणे
६.९.२०२० या दिवशी मी पू. भार्गवराम यांचे चित्र रेखाटले. त्या वेळीही मला आनंद जाणवत होता. माझ्या मनातील विचारांचे प्रमाण न्यून झाले होते. मला चित्र काढतांना एकाग्रता जाणवली. ‘हे चित्र रेखाटतांना २ घंटे कधी संपले ?’, हे माझ्या लक्षात आले नाही. चित्र काढतांना माझा ‘श्री विष्णवे नमः ।’ हा नामजप चालू होता. मला वेगळीच शांतता जाणवली.
४. पू. वामन आणि पू. भार्गवराम यांची चित्रे रेखाटतांना जाणवलेली सामायिक सूत्रे
अ. दोन्ही चित्रे काढतांना अधिक खाडाखोड झाली नाही. ‘चित्र काढत गेले आणि पूर्ण झाले’, असे मी प्रथमच अनुभवले.
आ. मला दोन्ही वेळी वातावरणात पुष्कळ हलकेपणा जाणवला आणि ‘चित्र काढतच राहूया’, असे मला वाटले.
५. चित्रे पूर्ण झाल्यावर त्या वेळी आलेल्या अनुभूतींचे टंकलेखन करतांना माझा भाव जागृत होऊन माझ्या डोळ्यांत अश्रू आले. माझा दोन्ही बालसंतांविषयी कृतज्ञताभाव जागृत झाला.
६. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई, पू. वामन राजंदेकर आणि पू. भार्गवराम प्रभु यांची चित्र रेखाटल्यानंतर मी माझी मुलगी कु. अपाला हिचे चित्र काढण्याचा प्रयत्न केला; पण मला ते काढता आले नाही.
‘हे गुरुदेवा, विचार देणारेही तुम्हीच आहात आणि कृती करवून घेणारेही केवळ तुम्हीच आहात. ‘तुमच्याच कृपेने मला संतांची चित्रे रेखाटण्याचा आनंद मिळाला’, यासाठी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. दीपा औंधकर, रत्नागिरी (१७.९.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |