अलिगड मुस्लिम विश्‍वविद्यालय म्हणजे ‘छोटा भारत’ ! – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी यांना जे वाटते ते या विश्‍वविद्यालयातील काही धर्मांध विद्यार्थ्यांना वाटत नाही. अशांचा बंदोबस्त व्हायला हवा !

अलीगड (उत्तरप्रदेश) – अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालय म्हणजे एक ‘मिनी इंडिया’ (छोटा भारत) आहे. येथे उर्दू, हिंदी, अरबी, संस्कृत शिकवले जाते. ग्रंथालयात कुराण आहे. त्यासमवेत अनुवादीत केलेली श्रीमद् भगवद्गीता आणि रामायणही आहे. अलीगढ मुस्लिम विश्‍वविद्यालय श्रेष्ठ भारताची चांगली प्रतिमा आहे. येथे इस्लामविषयी जे संशोधन केले जाते, त्यामुळे भारताचे इस्लामी देशांशी संबंध अधिक दृढ झाले आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयाचे कौतुक केले. ते या विश्‍वविद्यालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे कार्यक्रमाला उपस्थित होते.

मोदी पुढे म्हणाले की,

१. अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयाच्या भिंतींवर देशाचा इतिहास आहे. येथे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी जगभरात भारताचे नाव प्रकाशमान केले आहे. विश्‍वविद्यालयात शिकलेल्या विद्यार्थ्यांच्या अनेक वेळा परदेशात भेटी झाल्या. ते अभिमानाने सांगतात की, ‘आम्ही अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयात शिकलो आहोत.’ हे विश्‍वविद्यालय भारताचा अमूल्य ठेवा आहे. या इमारतीशी शैक्षणिक इतिहास जोडला गेलेला आहे.

२. समाजात वैचारिक मतभेद असतात; पण जेव्हा राष्ट्रासमोर लक्ष्यप्राप्तीचा उद्देश असतो, तेव्हा सगळे मतभेद बाजूला ठेवून द्यायला हवेत. देशात कुणी कोणत्याही जाती वा धर्मातील असो, प्रत्येकाने देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी योगदान द्यायला हवे. या विश्‍वविद्यालयात शिकलेल्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी विचारांना बाजूला ठेवून देशाच्या स्वातंत्र्यात योगदान दिले. राजकारण समाजाचा भाग आहे; पण राजकारण आणि सत्ता यांपेक्षा देशातील समाज वेगळा असतो.