सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे !
मुंबई – माहीम दर्ग्याचे विश्वस्त आणि वक्फ बोर्डाचे सदस्य डॉ. मुदस्सिर निसार लांबे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला असून त्यांच्या विरोधात माहीम पोलीस ठाणे, पोलीस आयुक्त, महिला आयोग आणि गृहमंत्री यांच्याकडे ७ डिसेंबर या दिवशी लेखी तक्रार केली आहे.
या तक्रारीमध्ये महिलेने आरोप केला आहे की, जानेवारी मासात एका कार्यक्रमाच्या वेळी डॉ. लांबे यांच्याशी भेट झाली. त्यानंतर कामानिमित्त आमच्या भेटीगाठी होत होत्या. या कालावधीत डॉ. लांबे यांनी माझ्यावर अतिप्रसंग केला. त्यांनी धमकी देऊन माझ्याशी संबंध ठेवले आणि विवाह करण्याचे आश्वासन दिले.
डॉ. लांबे यांनी मात्र सदर महिलेने केलेले आरोप खोटे असल्याचे सांगून ‘माझ्या विरोधात कट करण्यात आला आहे. महिलेने तक्रार करण्यापूर्वी मी तिच्या पतीविरुद्ध माहीम पोलीस ठाण्यात खंडणीची तक्रार केली आहे’, असे सांगितले. या प्रकरणी माहीम पोलीस ठाण्याच्या एका अधिकार्याने ‘महिलेच्या तक्रारीवरून अन्वेषण चालू असून यामध्ये काही तथ्य आढळल्यास कारवाई करण्यात येईल’, असे सांगितले.