शेतकरी आंदोलनात नक्षलवादी समर्थकाचे छायाचित्र कसे ? शेती आणि शेतकरी यांच्याशी त्याचा काय संबंध? – केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे प्रश्‍न

देहली येथील शेतकरी आंदोलनांमध्ये खलिस्तानी आणि नक्षलवादी यांचे समर्थक घुसले आहेत, हे विविध वाहिन्यांवरील वृत्तातून समोर येत आहे. याविषयी आता केंद्र सरकारने चौकशी केली पाहिजे, तसेच शेतकरी संघटनांनी याविषयी जाहीरपणे स्पष्टीकरण दिले पाहिजे !

शेतकरी आंदोलन

नवी देहली – मी सर्व शेतकरी किंवा शेतकरी संघटन यांविषयी बोलत नाही; मात्र  गडचिरोली जिल्ह्यात एका नक्षलवादी चळवळीला समर्थन करणार्‍या एका व्यक्तीची चौकशी करण्यात आली होती. त्याचे शेतकरी आंदोलनातील छायाचित्र कसे काय समोर आले ? शेती आणि शेतकरी यांच्याशी त्याचा काय संबंध ?

भारतविरोधी भाषण देणारी एखादी व्यक्ती, ज्याचा शेतकर्‍यांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे काहीच संबंध नाही त्यांची छायाचित्रे कशी काय समोर येत आहेत?, असे प्रश्‍न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर उपस्थित केले आहेत. ‘काही घटक शेतकरी आंदोलनाचा लाभ घेत त्यांची अपकीर्ती करत असल्याचे धोरण पुढे नेत आहेत. शेतकर्‍यांनी यापासून लांबच राहिले पाहिजे, हेच मला सांगायचे आहे’, असा आरोपही त्यांनी केला.