शिवप्रतापदिन हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्यात यावा ! – मिलिंद एकबोटे

निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

सातारा, १२ डिसेंबर (वार्ता.) – प्रतिवर्षी सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रतापगड येथे शिवप्रतापदिन साजरा करण्यात येतो; मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उत्तुंग पराक्रमाला साजेसा उत्सव गत अनेक वर्षांत झाला नाही. त्यामुळे शिवछत्रपतींच्या पराक्रमाला साजेसा उत्सव सातारा जिल्हा प्रशासनाने साजरा करावा. तसेच शिवप्रतापदिन हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्यात यावा, असे आवाहन प्रतापगड उत्सव समितीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी केले.

प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने मिलिंद एकबोटे यांनी सातारा येथील निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी हिंदु महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अधिवक्ता गोविंदजी गांधी, जिल्हाध्यक्ष अधिवक्ता दत्ताजी सणस, जिल्हा उपाध्यक्ष धनराज जगताप, कार्यकारणी सदस्य उमेश गांधी, भाजपचे नगरसेवक विजयकुमार काटवटे, शिवसेनेचे शहराध्यक्ष निमिष शहा, सम्राट गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष नीलेश शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की,

१. प्रतापगड येथे शिवप्रतापदिनी शासनाच्या वतीने शिवप्रतापाचे मोठे चित्र लावण्यात यावे.

२. श्री शिवछत्रपतींना या प्रसंगी शासकीय मानवंदना देण्यात यावी.

३. श्री शिवछत्रपतींच्या मूर्तीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याची प्रथा कायम ठेवावी. ही प्रथा कोणत्याही परिस्थितीमध्ये खंडित करण्यात येऊ नये.

४. सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये शिवप्रतापदिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात यावे. तसे आदेश संबंधित यंत्रणेला देण्यात यावेत.

५. शिवप्रतापदिनी किल्ले प्रतापगड येथे विद्युत् रोषणाई करण्यात यावी.

६. या उत्सवाच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची समिती गठीत करण्यात यावी. प्रतापगड उत्सव समितीने वर्ष १९९६ मध्ये हा उत्सव प्रारंभ केला. त्यामुळे तत्कालीन समितीचा यामध्ये समावेश करण्यात यावा.

७. सातारा जिल्हा शूरवीरांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात माजी सैनिक आहेत. त्यांना या कार्यक्रमासाठी सन्मानाने आमंत्रित करण्यात यावे.