महिला आणि बालकांसाठीच्या संरक्षण, प्रतिबंधात्मक कायद्यांवर कार्यवाही करा ! – संतोष पाटील, जिल्हाधिकारी, सातारा

सातारा, २५ मार्च (वार्ता.) – महिला आणि बालक यांच्याविषयी असणार्‍या संरक्षण तसेच प्रतिबंधात्मक कायद्यांवर प्रभावी कार्यवाही करा. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक तक्रारीवर जलद कार्यवाही करून पीडित महिलेला दिलासा देण्याचे काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा सनियंत्रण समितीच्या बैठकीमध्ये ते बोलत होते.

जिल्हाधिकारी पाटील पुढे म्हणाले, ऑक्टोबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीमध्ये ४५३ प्रकरणांपैकी ३३७ प्रकरणे समुपदेशनाने निकाली निघाली आहेत. ही संख्या चांगली असून अधिकाधिक प्रकरणे समुपदेशाने कशी मिटतील, यावर भर देण्यात यावा. महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंधक अधिनियमांतर्गत भीक मागणे कायद्याने गुन्हा आहे. ज्या ज्या ठिकाणी भिक्षेकरी मोठ्या प्रमाणात आढळून येतात, त्या त्या ठिकाणी पोलीस आणि जिल्हा महिला अन् बालविकास विभागाने धाड घालणे आवश्यक आहे. हरवलेल्या बालकांचा उपयोग भिक्षा मागण्यासाठी करण्यात येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे. याविषयी संवेदनशील राहून लहान मुलांची यातून सुटका करावी. जिल्ह्यातील पोक्सो कायद्यांतर्गत नोंदीत प्रकरणांमध्ये तातडीने कार्यवाही करावी. यामध्ये पीडितांची ओळख उघड होणार नाही, याचीही काटेकोरपणे दक्षता घ्यावी.