Murder Accused Acquitted In Japan : जपानमध्ये हत्येच्या प्रकरणी ४७ वर्षे कारावास भोगल्यावर आरोपी ठरला निर्दाेष

जपान सरकार हानीभरपाई म्हणून १२ कोटी रुपये देणार

निर्दाेष ठरवण्यात आलेले ८९ वर्षीय इवाओ हाकामाता

टोकियो (जपान) – जपानमध्ये हत्येच्या प्रकरणी ४७ वर्षे कारावास भोगल्यानंतर निर्दाेष ठरवण्यात आलेल्या ८९ वर्षीय इवाओ हाकामाता यांना जपान सरकारने १२ कोटी रुपये हानीभरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. आरोप सिद्ध करण्यासाठी खोटे पुरावे सादर करण्यात आले होते, असे उघड झाल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

१. वर्ष १९६६ मध्ये हाकामाता यांना त्यांचे प्रमुख, त्यांची पत्नी आणि त्यांच्या २ मुले यांची हत्या केल्याबद्दल, त्यांच्या घराला आग लावल्याबद्दल आणि २ लाख येन (जपानी चलन) चोरल्याबद्दल शिक्षा सुनावण्यात आली होती.

२. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जपानमधील शिझुओका शहरातील न्यायालयाने त्यांना सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त केले.

३. हाकामाता यांची बहीण हिदेको हिने तिच्या भावाचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा करण्यासाठी वर्षानुवर्षे कठोर परिश्रम केले. त्यानंतर न्यायालयाने वर्ष २०१४ मध्ये पुन्हा खटल्याची सुनावणी चालू केली आणि हकामाता यांची सुटका केली.

४. हाकामाता यांनी आधी सर्व आरोप नाकारले होते; परंतु नंतर त्यांनी आरोप मान्य केले. सुनावणीच्या वेळी असे समोर आले की, हाकामाता यांना मारहाण करण्यात आली होती आणि त्यांना गुन्ह्याची स्वीकृती देण्यास भाग पाडण्यात आले होते.

संपादकीय भूमिका

भारतात अशा अनेक घटना घडत असतात; मात्र कधीही सरकार किंवा संबंधित यंत्रणांकडून १ रुपयाचीही हानीभरपाई संबंधितांना मिळत नाही ! जपानसारखी संवेदनशीलता आणि माणुसकी भारतामध्ये कधी येणार ?