मंदिरे केवळ अर्थार्जनासाठी ?

दळणवळण बंदीच्या कालावधीमध्ये अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि काही राजकीय पक्ष यांनी मंदिरे उघडण्याची मागणी शासनाकडे लावून धरली. मंदिरे उघडल्यास मंदिरांवर उपजीविका अवलंबून असलेल्या लोकांना रोजगार उपलब्ध होईल, हे बहुतांश हिंदु संघटनांचे मुख्य सूत्र होते. पाठ्यपुस्तकात किंवा प्रश्‍नपत्रिकेमध्ये ‘योग्य जोड्या लावा’ असा एक प्रश्‍न असतो. त्यामध्ये एकमेकांना अनुरूप शब्दांची जोडी लावली जाते. ‘मंदिर’ या शब्दासाठी ‘रोजगार’ आणि ‘श्रद्धा’, असे २ पर्याय असतील, तर कोणता पर्याय निवडला जाईल ? साहजिकच ‘श्रद्धा’ हाच पर्याय असेल, हे अगदी नास्तिकही सांगतील, तर मग मंदिरे उघडण्यासाठी रोजगाराचे पालूपद लावण्याची आवश्यकता हिंदूंना का भासली ?

मंदिरांवर अनेकांची उपजीविका अवलंबून असते, ही वस्तूस्थिती आहे; पण पूजासाहित्यावर उपजीविका करणारे काय केवळ मंदिरांच्या बाहेर असतात ? दर्गे आणि चर्चच्या बाहेर नसतात का ? त्यांनी तशी मागणी केली नाही; कारण त्यांना दर्गे आणि चर्च कशासाठी आहेत, हे चांगलेच ठाऊक आहे. मंदिराच्या बाहेर फळ-फुलांची विक्री करणारे किंवा पूजा करणारे यांचे पोट त्यावर अवलंबून असले, तरी याकडे अर्थार्जनाचे साधन म्हणून पहाण्याऐवजी भगवंताच्या सेवेची संधी असा भाव ठेवून मंदिरे उघडण्याची मागणी केली असती, तर त्यांच्यावर खर्‍या अर्थाने भगवंताची कृपा झाली असती. तसा भाव नसेल, तर मंदिरात जाणारेही भगवंताप्रती श्रद्धा आणि भाव याऐवजी मूर्तीसाठी किती रुपयांचा हार घेतला ? यावरून भक्तीचे मोजमाप करतील.

रोजगार देणारी अनेक साधने उपलब्ध होतील; मात्र आत्मशांती आणि आध्यात्मिक शक्ती बाजारात मिळणार नाही. शांतता स्मशानात आणि बारमध्येही असते; मात्र स्मशानातील शांतता तमोगुणी, बारमधील रजोगुणी आणि मंदिरातील शांतता सत्त्वप्रधान असते. मद्यपींसाठी बार उघडणार्‍या शासनाला, हे हिंदूंनी ठामपणे सांगायला हवे होते. असा धर्माभिमान बहुतांश हिंदूंमध्ये नाही, अन्यथा भारतात मंदिरे उद्ध्वस्त होऊन मशिदी उभ्या राहिल्या नसत्या.

– श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई