‘अर्जुन पुरस्कार’ प्राप्त सुभेदार अजय सावंत यांचा पणजी (गोवा) आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्कार

मातृभूमीला गौरव प्राप्त व्हावा, यासाठी घेतलेले परिश्रम फलद्रूप झाले ! – सुभेदार अजय सावंत

सुभेदार अजय सावंत (मध्यभागी) यांचा सत्कार करतांना प्रा. सुभाष वेलींगकर आणि समवेत सुभेदार अजय यांची आई श्रीमती अनिता सावंत

सुभेदार अजय सावंत यांचा परिचय

श्री. गणेश गावडे यांनी सुभेदार अजय सावंत यांचा परिचय करून देतांना सांगितले की, ‘टेण्ट पेगिंग’ या घोडेस्वारीच्या अवघड प्रकारात ‘अर्जुन पुरस्कार’ मिळाला आहे. तलवार, भाला, तसेच ‘टेण्ट पेगिंग’ आदी क्रीडा प्रकारात देशात आणि विदेशात सुवर्ण, रौप्य अशी १५६ पदके त्यांनी पटकावली. सैन्यदलानेही ६ पदके देऊन त्यांना गौरवान्वित केले आहे.

पणजी – वर्ष २०२० चा राष्ट्रीय स्तरावरचा प्रतिष्ठेचा ‘अर्जुन पुरस्कार’ प्राप्त केल्याविषयी भारतीय सैन्यातील ‘६१ कॅव्हलरी दला’चे सुभेदार अजय अनंत सावंत (मूळ सरगवे, दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग) यांचा पणजी, गोवा येथे ‘भारत माता की जय’ संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच त्यांचे मूळ गाव असलेल्या सरगवे येथील ग्रामस्थांनी सरगवे येथे, तर माजी पालकमंत्री तथा शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे यथोचित सत्कार केला. पणजी येथे झालेल्या सत्कार सोहळ्यात मनोगत व्यक्त करतांना सुभेदार सावंत म्हणाले की, ‘माझ्या मातृभूमीला गौरव प्राप्त व्हावा, ही एकमेव प्रेरणा हृदयात घेऊन, विपरीत परिस्थितीतही मी सतत परिश्रम घेतले. हे परिश्रम फलद्रूप झाले.’

पणजी – ‘भारत माता की जय’ संघाच्या वतीने येथील सिद्धार्थ बांदोडकर भवनमध्ये संघाचे राज्य संरक्षक प्राचार्य सुभाष वेलींगकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुभेदार सावंत यांच्या मातोश्री श्रीमती अनिता अनंत सावंत यांनाही या वेळी सन्मानित करण्यात आले. श्रीमती सावंत यांचे पती सैन्यात होते.

या प्रसंगी व्यासपिठावर ‘भारत माता की जय’ संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. गोव्याचे अर्जुन पुरस्कार विजेते प्रसिद्ध फुटबॉलपटू ब्रह्मानंद शंखवाळकर यांची आवर्जून विशेष उपस्थिती होती.

सैनिकाचा सत्कार हा देशाचा सत्कार ! – प्रा. सुभाष वेलींगकर

‘कोणतेही राष्ट्र त्यातील सैनिक, किसान आणि शिक्षक या ३ क्षेत्रांच्या आधारावर टिकून रहाते. सैनिक प्राण तळहातावर घेऊन देशासाठी लढत असतो. त्यांचा सन्मान हा देशाचा सन्मान असतो.


सिंधुदुर्गमधील तरुणांनी सुभेदार अजय सावंत यांचा आदर्श घेऊन सैन्यात भरती व्हावे ! – दीपक केसरकर, माजी पालकमंत्री

सिंधुदुर्ग – अर्जुन पुरस्काराने सिंधुदुर्गची शान राखली. यापुढील छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार मिळण्यासाठी निश्‍चितच सिंधुदुर्गवासियांचे आशीर्वाद तुम्हाला आहेत. सरगवेसारख्या ग्रामीण भागातून सैन्यात भरती झाल्यानंतर सुभेदार पदापर्यंत अजय सावंत पोचले आणि त्यांचा सत्कार राष्ट्रपतींनी अर्जुन पुरस्कार देऊन केला, याचा आम्हाला अभिमान आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांनी सैन्यात भरती होतांना सुभेदार सावंत यांच्यासारखे आदर्श काम करून पुरस्काराच्या ध्येयापर्यंत पोचावे, असे आवाहन सुभेदार अजय सावंत यांचा सत्कार करतांना माजी पालकमंत्री तथा शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी केले.

सावंतवाडी येथे आमदार केसरकर यांच्या निवासस्थानी सुभेदार सावंत यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी माजी सैनिक श्रीकांत उसपकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश प्रसाद गवस, सरगवे ग्रामपंचायत सदस्य शंकर देसाई, माजी सैनिक सुभेदार शशिकांत उपाख्य सुभाष गावडे आदी उपस्थित होते.


सरगवे ग्रामस्थांनी केला सुभेदार अजय सावंत यांचा सत्कार

दोडामार्ग – सुभेदार अजय सावंत यांचा सरगवे ग्रामस्थांच्या वतीने आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी कॅप्टन कृष्णा गवस, मधुकर सावंत, अर्जुन सावंत, ग्रामपंचायत सदस्य शंकर देसाई, पोलीस पाटील प्रमोद सावंत आणि सुभेदार सावंत यांच्या मातोश्री अनिता सावंत उपस्थित होते.