|
न्यूयॉर्क – हिंदु, बौद्ध आणि शीख यांवर होणार्या आक्रमणांची नोंद घेण्यात संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेला अपयश आले आहे, अशी टीका भारताचे प्रतिनिधी आशिष शर्मा यांनी केली. शांततेची संस्कृती केवळ ‘अब्रॅहॅमिक’ धर्मांसाठीच (एका मान्यतेनुसार ज्यू, ख्रिस्ती आणि मुसलमान या ‘अब्राहम’ नावाच्या दैवी अवतारापासून निर्माण झालेले धर्म) असू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले. या महासभेमध्ये ‘आज शांततेची संस्कृती’ या सूत्रावर चर्चा करण्यात आली.
India speaks in UNGA on “Culture of Peace”
Every major world religion has a home in India, making it a civilization in itself.
UN & @UNAOC should not take sides on religion
Attacks against Buddhism, Hinduism, Sikhism should also be condemned.
Watch ⤵️ @MEAIndia @VikasSwarup pic.twitter.com/pbJpO8xyhj
— India at UN, NY (@IndiaUNNewYork) December 2, 2020
शर्मा पुढे म्हणाले की,
१. जगभरात अनेक न जुळणारे दुवे आहेत. ज्यूविरोध, इस्लामविरोध आणि ख्रिस्तीविरोध दर्शवणार्या घटनांचा निषेध केलाच पाहिजे; मात्र संयुक्त राष्ट्रांच्या ठरावामध्ये केवळ याच ३ धर्मांच्या सूत्रांचा उल्लेख आहे. हिंदु, बौद्ध आणि शीख यांवर होत असलेल्या अत्याचारांकडे संयुक्त राष्ट्रांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
२. शांततेची संस्कृती निवडक धर्मांसाठी असू शकत नाही. हा दुजाभाव जोपर्यंत आहे, तोपर्यंत शांततेची संस्कृती खर्या अर्थाने नांदूच शकत नाही. आपल्याला संस्कृतींना एकत्र आणायचे आहे, त्यांच्यात भांडणे लावायची नाहीत. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांनी त्यानुसार काम करावे आणि ‘निवडकपणा’ सोडून द्यावा.
३. अफगाणिस्तानमधील बामियान येथील ऐतिहासिक बौद्ध मूर्ती आतंकवाद्यांनी तोडल्या. या देशातील गुरुद्वारांवरही आक्रमणे झाली. हिंदु मंदिरांवरही आक्रमणे झाली; मात्र इस्लाम, ज्यू आणि ख्रिस्ती धर्मांवर झालेल्या आक्रमणांच्या वेळी जितक्या ठामपणे निषेध केला जातो, तसा निषेध या घटनांच्या वेळी केला जात नाही.
४. हिंदु, बौद्ध आणि शीख या तिन्ही धर्मियांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे पुढील वेळी असा ठराव करतांना इस्लाम, ज्यू आणि ख्रिस्ती धर्मांसमवेतच या ३ धर्मांचाही त्यात समावेश करावा, असे आवाहन शर्मा यांनी केले.
पाककडून संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ठरावाचा भंग ! – भारत
पाकने ‘पाकिस्तान शीख गुरुद्वारा प्रबंधक समिती’कडून कर्तारपूर साहिब गुरुद्वाराचे व्यवस्थापन काढून घेत ते ‘इव्हॅक्युई ट्रस्ट प्रॉपर्टी मंडळा’च्या प्रशासकाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे पाकिस्तानने शांततेविषयीच्या संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाचा भंग केला आहे. त्यांनी कर्तारपूर गुरुद्वाराचे व्यवस्थापन बिगरशीख व्यवस्थापनाकडे सोपविले आहे, अशी टीका भारताने महासभेमध्ये केली.