डिचोली, २ डिसेंबर (वार्ता.) – ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या दूर करून ज्येष्ठ नागरिकांना सर्वतोपरी समाधान देण्याचा आणि सहकार्य करण्याचा प्रयत्न शासकीय यंत्रणेमार्फत केला जाईल, असे प्रतिपादन डिचोलीचे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांनी डिचोली येथे आयोजित करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या बैठकीत केले. ही बैठक उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षात उपजिल्हाधिकारी श्री. वायंगणकर यांनी आयोजित केली होती.
या बैठकीस तालुका शासकीय समितीचे अध्यक्ष श्री. रामचंद्र पळ, अखिल गोवा ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष श्री. रामनाथ देसाई, उपाध्यक्ष कॅजिटन वाझ, खजीनदार विजय तेलंग, ज्येष्ठ नागरिक एम्.के. पाटील, श्री. देऊ पळ, श्री. मोहन गावकर आदी मंडळी उपस्थित होती. ज्येष्ठ नागरिकांनी ‘मेन्टेनन्स’ कायद्याच्या संदर्भात आणि इतर समस्या मांडून त्या संदर्भात योग्य ती कारवाई करण्याची मागणी उपजिल्हाधिकार्यांकडे केली. या सर्व समस्या जाणून घेतल्यानंतर उपजिल्हाधिकारी श्री. वायंगणकर यांनी त्या दूर करण्याचे आश्वासन दिले आणि डिचोलीतील अन् परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघटना आणि ज्येष्ठ नागरिक यांनी शासकीय यंत्रणेस सहकार्य करण्याचे आवाहन केले.