पाकचे पत्रकार कुअंर शाहिद यांनी दाखवला पाकच्या पंतप्रधानांना आरसा !

फ्रान्समधील मुसलमानांवर बोलणारे पाक नेते चीनमधील उघूर मुसलमानांवर मौन बाळगतात !

सोनाराने कान टोचले की, अधिक योग्य ठरते; मात्र पाकसारख्या कोडग्या देशावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, हेही तितकेच खरे !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – फ्रान्समध्ये कट्टरतावादी मुसलमानांवर वचक ठेवण्यासाठी सरकार कायदा करत आहे. तसेच महंमद पैगंबर यांच्या व्यंगचित्राच्या केलेल्या समर्थनावरून पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यावर टीका केली होती. यावरून पाकमधील पत्रकार कुअंर खुलदने शाहिद यांनी इम्रान खान यांना आरसा दाखवला आहे. ‘फ्रान्सवर टीका करणारे इम्रान खान चीनमध्ये उघूर मुसलमानांवर होणार्‍या अत्याचारांवर मौन बाळगतात’, अशी शाहिद यांनी टीका केली आहे.

पाकिस्तानी पत्रकार कुंवर खुलदने शाहिद

पत्रकार शाहिद यांनी म्हटले आहे की,

१. पाकिस्तानच्या नेत्यांना फ्रान्समधील मुसलमानांविषयी अधिक आकर्षण आहे; मात्र दुसरीकडे ते उघूर मुसलमानांविषयी मौन बाळगतात. ते हे पहात नाहीत की, फ्रान्समध्ये इस्लाम वेगाने वाढत आहे. वर्ष १९७१ मध्ये तेथे अवघ्या ३३ मशिदी होत्या, आज तेथे २ सहस्र ५०० मशिदी आहेत. (यामुळेच आज फ्रान्सला जिहादी आतंकवादी आणि कट्टरतावादी यांचा धोका निर्माण झाला आहे. – संपादक)

२. ही दयनीय गोष्ट आहे की, पाकिस्तान दुसर्‍या धर्मांच्या प्रती सहिष्णुतेचे पालन करत नाही. पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळांची संख्या घसरत चालली आहे. देशातील अहमदिया मुसलमानांच्या विरोधात भेदभाव केला जात आहे. प्रतिवर्षी एक सहस्र लोकांचे इस्लाममध्ये धर्मांतर केले जात असतांना पाकिस्तानला वाटते की, तो फ्रान्सला धार्मिक स्वातंत्र्यावर सल्ले देऊ शकतो. का ?

पाकच्या मंत्र्याचा खोटारडेपणा !

पाकचे मानवाधिकार मंत्री शिरीज मजारी यांनी एका खोट्या बातमीची लिंक ट्वीट केली होती. त्यात म्हटले होते, ‘फ्रान्समधील मुसलमान मुलांना ओळख क्रमांक दिला जाणार असून त्यातून त्यांना ओळखता येणार आहे.’ मजारी यांनी या घटनेची तुलना ज्यूंसमवेत केली होती. ते म्हणाले होते की, ज्या प्रकारे नाझींनी ज्यू यांच्यावर अत्याचार केले होते, तसेच काहीसे अत्याचार फ्रान्स शासन तेथील मुसलमानांवर करू पहात आहे; मात्र फ्रान्सच्या दूतावासाने हे वृत्त खोटे असल्याचे सांगत फेटाळले होते. त्यानंतर मजारी यांनी ट्वीट डिलीट केले; मात्र परत प्रश्‍न उपस्थित केला, ‘फ्रान्समध्ये सार्वजनिक ठिकाणी ख्रिस्ती नन त्यांचा पोशाख घालू शकते, तर मुसलमान महिला हिजाब का घालू शकत नाही ?’ यावर शाहिद यांनी म्हटले की, मजारी यांना ठाऊक असूनही ते याकडे दुर्लक्ष करत आहेत की, फ्रान्समध्ये सर्व धर्मियांनाच सार्वजनिक ठिकाणी धार्मिक पोशाख वापरण्यास बंदी आहे. ज्या गोष्टींमुळे फ्रान्सला लक्ष्य केले जात आहे, त्या गोष्टी इस्लामी देशांत तर आधीपासून आहेतच ! या गोष्टींपैकी एक महत्त्वपूर्ण सूत्र म्हणजे मशिदी आणि इमाम यांच्यावर यापुढे फ्रान्स सरकारचे नियंत्रण असणार आहे. हे इस्लामी देशांत आधीपासून आहेच.