भाग्यनगरचे रणांगण !

हैद्राबाद (भाग्यनगर) महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीचे मतदान १ डिसेंबर या दिवशी होत आहे. एका महानगरपालिकेची निवडणूक असूनही तो राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय झाला आहे; कारण प्रत्येक पक्षाने तेथे केलेले शक्तीप्रदर्शन ! भाजपकडे सध्या त्या महापालिकेतील केवळ ४ जागा आहेत. असे असूनही भाजपने पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ म्हणून ओळख असलेले योगी आदित्यनाथ यांना निवडणुकीच्या प्रचारार्थ भाग्यनगरमध्ये उतरवले आहे. त्यामुळे ओवैसी यांनी ‘ही पंतप्रधानपदाची निवडणूक नाही’, अशी टीका भाजपवर केली. टीका करणारे बोलतच असतात. त्याकडे दुर्लक्ष करून भाजपच्या भूमिकेकडे पाहिले असता या वेळी भाग्यनगरमधील हिंदूंच्या अस्मिता जागृत करण्याचे काम भाजपने आरंभले आहे, असे दिसते.

महानगरपालिकेच्या गेल्या निवडणुकीत सत्ताधारी तेलंगाणा राष्ट्र समितीला ९९, एम्.आय.एम्.ला ४४, तर भाजपला केवळ ४ जागा होत्या. तेलंगाणा राष्ट्र समितीचे राजकारण आणि प्रशासन पहाता ते तुष्टीकरणावर आधारित आहे. एम्.आय.एम्.ची ओळखच विखारी हिंदुद्वेषी राजकारण, कट्टर इस्लामी मानसिकता, हिंदूंची दडपशाही अशी आहे. सध्या वरकरणी भाग्यनगर हा इस्लामचे प्राबल्य असलेला प्रदेश वाटला, तरी आकडेवारी भाजपसाठी आशादायी आहे. योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या धर्मनिष्ठ नेत्याला भाग्यनगरमध्ये पाठवण्याचे कारण तेही असू शकते. गृहमंत्री अमित शहा यांचीही सामाजिक प्रतिमा गुजरातमध्ये असल्यापासूनच आश्‍वासक आहे. असे नेते भाग्यनगरमध्ये भाजपचे स्वतंत्र स्थान निर्माण करण्यात निश्‍चितच साहाय्यभूत ठरतील. वास्तविक भाग्यनगरची ओळख ही एम्.आय.एम्.चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा बालेकिल्ला म्हणून आहे. असे असले, तरी भाग्यनगरमध्ये ५१ टक्के लोकसंख्या हिंदु आहे. ज्या धर्मांधांच्या हिंसक मानसिकतेसाठी भाग्यनगर ओळखले जाते, त्यांची शहरातील लोकसंख्या ४३ टक्के आहे. ज्याप्रमाणे इस्लामचा तेथे दबदबा आहे, त्याचप्रमाणे हिंदूंचेही संघटन लक्षणीय आहे. भाग्यनगरमध्ये श्रीरामनवमीच्या दिवशी लाखो हिंदूंच्या उपस्थितीत होणारी फेरी हे हिंदूंमध्ये जागृत असलेल्या धर्मनिष्ठेचे प्रतीक आहे. त्यामुळे एकूण स्थितीचा विचार करता भाजपने तेथे सर्व प्रतिष्ठित आणि राष्ट्रीय नेते प्रचारासाठी उतरवले, तर त्यात काही गैर नाही.

विखारी कट्टरवादाला पर्याय

धर्मांधांच्या कुरापती, सततचे सामाजिक ताणतणाव, दंगली, गलिच्छ रहाणीमान यांनी सभ्य समाज त्रस्त असतो. खासदार असदुद्दीन यांचे धाकटे बंधू आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी यापूर्वी काढलेले १५ मिनिटे पोलीस हटवण्याचे आणि हिंदूंना नष्ट करण्याचे विधान अजून कुणी विसरलेले नाही. ईदच्या काळात होणार्‍या गोवंशहत्या, लहान-सहान कारणांवरून होणार्‍या जातीय दंगली, हिंदूंच्या उत्सवांच्या वेळी जाणीवपूर्वक निर्माण केलेले तणावपूर्ण वातावरण कुणाला प्रिय असते का ? गेल्या अनेक वर्षांत इतकी सामान्य स्थितीही या शहरात येऊ शकलेली नाही. कदाचित् त्यामुळेच ओवैसींच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या पक्षाहून तेलंगाणा राष्ट्र समितीला दुप्पट जागा आहेत. असे असले, तरी तेलंगाणा राष्ट्र समितीचे प्रशासन पहाता त्यांच्याकडून शांत आणि संपन्न जीवनाची जी अपेक्षा एक सामान्य नागरिक करतो, तिची पूर्तता होणे शक्य नाही. भाग्यनगरमध्ये ५१ टक्के जो हिंदु समाज आहे, तो मतदानासाठी बाहेर पडेल आणि त्यातल्या त्यात जवळचा म्हणून हिंदूंनी भाजपला मतदान केले, तरी चित्र पालटेल. अर्थात् ही स्थिती येण्यात मुख्य अडथळा आहे, तो दक्षिणेकडील राज्यांत तीव्र स्वरूपात असलेल्या भाषिक आणि प्रांतीय अस्मिता यांचा ! त्यामुळेच लोक स्थानिक पक्षांना प्राधान्य देतात. तरीही भाजपने सक्षम उमेदवार दिले, तर त्यांना ४ हून अधिक जागांपर्यंत निश्‍चित जाता येईल. भाजपने तेथे पर्याय म्हणून उभे रहावे, याचा अर्थ इस्लामी कट्टरवादाला पर्याय उभा रहावा. सध्या तरी तो पर्याय भाजप असू शकतो. प्रचारसभांमध्ये मांडले गेलेले हैद्राबादचे नामांतर भाग्यनगर करण्याचे सूत्र पहाता भाजपचा पुढील प्रवास दिसून येतो. भाजपची गत काही वर्षांतील वाटचाल पाहून स्थानिक पक्ष भाजपपासून दूर राहून स्वतःचे अस्तित्व जपण्याचा प्रयत्न करू लागतात. जर खरोखरच भाग्यनगरमधील हिंदूंना मुसलमानधार्जिण्या राजवटीच्या जाचातून सोडवायचे असेल, तर त्यासंदर्भात भाजपने विशेष काळजी घेतली पाहिजे.

राजकारणाचे बळी !

आतापर्यंत भाग्यनगरमध्ये हिंदूंचे दमनच केले गेले. मुसलमानांचे तरी धर्मांधांच्या राज्यात कल्याण झाले का ? आकडेवारी सांगते की, भाग्यनगरमधील ६३ टक्के मुसलमान दारिद्र्यरेषेखालील जीवन जगतात. भाग्यनगर हे काही छोटेसे खेडेगाव नाही. भाग्यनगर हे बेंगळुरूप्रमाणे माहिती-तंत्रज्ञानाच्या आस्थापनांनी गजबजलेले आहे. शिक्षण आणि रोजगार यांच्या चांगल्या संधी उपलब्ध होण्यासाठी तेथे वेगवेगळ्या राज्यांतून युवक-युवती येत असतात. असे असूनही भाग्यनगरमधील जो स्थानिक मुसलमान आहे, त्याचा विकास झालेलाच नाही. आतापर्यंत धर्मांधांच्या भावना भडकावून त्याचा राजकीय लाभ घेणारा काँग्रेस पक्ष होता. काँग्रेसने ७० वर्षे मुसलमानांना अक्षरशः वापरले आणि आता मुसलमानांना काँग्रेसने त्यांच्या भावनांशी खेळ केल्याची जाणीव झाली. अशाच प्रकारे ‘एम्.आय.एम्., तेलंगाणा राष्ट्र समिती आदी पक्षही केवळ स्वतःच्या राजकीय तुंबड्या भरून घेत आहोत’, हे मुसलमानांना कळेपर्यंत कदाचित् त्यांचे अधिक पतन झालेले असेल. कसेही असले, तरी यंदाची निवडणूक एम्.आय.एम्. आणि तेलंगाणा राष्ट्र समिती यांना कठीण जाणार आहे, हे निश्‍चित ! ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यास विरोध करणारे, ‘हिंदुस्थान’ शब्दाची अ‍ॅलर्जी असणारे आणि त्यांना थारा देणारे अशा सर्वांना त्यांची जागा दाखवून देण्याची संधी भाग्यनगरवासियांना आहे. तेथील श्री भाग्यलक्ष्मीदेवी या आधुनिक मोगलांच्या तावडीत असूनही भक्तांचे रक्षण करत आहे. तिच्याच कृपेने इस्लामी कट्टरवादाचे उच्चाटन होईल, यात शंका नाही !